Pharma Firm Pfizer Paternity Leave : फार्मा कंपनी फायझर इंडियाने (Pfizer India) मोठा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. वडील झाल्यावर कर्मचाऱ्यांना 12 आठवड्यांची सुट्टी (Paternity Leave) देण्याचा मोठा निर्णय फायझर कंपनीने घेतला आहे. कंपनीने 1 जानेवारी 2023 पासून हे नवीन धोरण अंमलात आणले आहे. कर्मचाऱ्यांना चार टप्प्यामध्ये ही पॅटर्निटी लिव्ह (12 Week Paternity Leave) घेता येणार आहे. तसेच बायोलॉजिक तसेच दत्तक बाळांच्या वडीलांनाही ही 12 आठवड्यांची सुट्टी मिळणार आहे. फायझर कंपनीने गुरुवारी याबाबत अधिकृत धोरण जाहीर केले आहे. 


वडील झाल्यावर फायझर इंडिया कंपनी देणार 12 आठवड्यांची सुट्टी


फायझर इंडिया कंपनीच्या या पॉलिसीमुळे नवजात बाळ आणि दत्तक बाळ असलेल्या वडिलांना दोन वर्षांच्या कालावधीत 12 आटवड्यांची जास्तीत जास्त रजा घेता येणार आहे. कंपनीकडून कर्मचाऱ्यांनी चार टप्प्यात रजा घेण्याचा पर्याय देण्यात आला आहे. इतकेच नाही तर वडील झाल्यावर कर्मचाऱ्याला कंपनीकडून कमीत कमी दोन आठवडे आणि जास्तीत जास्त सहा आठवड्यांपर्यंत सुट्टी घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल. यामध्ये पॅटर्निटी लिव्ह (Paternity Leave), प्रासंगिक रजा (Casual Leave), ऐच्छिक रजा (Elective Holidays) या रजा मिळून सुट्ट्या घेण्याचा पर्याय असेल. 


अनेक कंपन्यांकडून पॅटर्निटी लिव्हमध्ये वाढ


अनेक कंपन्यांमध्ये पॅटर्निटी लिव्हमध्ये वाढ करण्यात आली आहे. बाळाचे संगोपन ही आईची जबाबदारी असल्‍याच्या रूढी आता मोडत आहे. बाळाच्या जन्मानंतर आई आणि वडील दोघांचाही बाळाच्या संगोपनात मोठा वाटा असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे कंपन्याही ही जबाबदारी लक्षात घेत आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांनी पॅटर्निटी लिव्हमध्ये वाढ केली आहे.


पुरुष सहकाऱ्यांना पालकत्वाचा अनुभव घेण्याचा अनुभव


फायझर इंडियाने नवीन पॅटर्निटी लिव्ह म्हणजे पितृत्व धोरणावर आपले मत मांडताना फायझर इंडियाचे  डायरेक्टर पीपल एक्सपिरिअन्स शिल्पी सिंह यांनी सांगितले की, 'आम्हाला विश्वास आहे की प्रगतीशील कार्य आणि भविष्यातील दृष्टीकोन पाहता कंपनीने हे नवीन धोरण लागू केले आहे. 12 आठवड्यांची पितृत्व रजा पॉलिसीमुळे (Paternity Leave Policy) पुरुष सहकाऱ्यांना आणि त्यांच्या जोडीदारांना पालकत्वाचा अनुभव आणि आनंददायी क्षण जपण्यास पुरेसा वेळ मिळेल. या स्वरूपाचे प्रगतीशील धोरण म्हणजे कामाच्या ठिकाणी समानतेच्या सामर्थ्याचा वापर करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही पालक म्हणून त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या निभावण्यासाठी समान वेळ घालवता येईल.'