नवी दिल्ली : ज्या नागरिकांनी त्यांचे आधार आणि पॅन कार्ड दिलेल्या मुदतीत लिंक (PAN Aadhaar Link) केलं नाही त्यांच्याकडून केंद्र सरकारने मोठा आर्थिक दंड वसूल केला आहे. अशा नागरिकांकडून आतापर्यंत केंद्र सरकारने 600 कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.


केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सोमवारी संसदेत माहिती दिली की, आतापर्यंत सुमारे 11.48 कोटी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे बाकी आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, 29 जानेवारी 2024 पर्यंत आधारशी लिंक न केलेल्या पॅनची संख्या, सूट मिळालेली श्रेणी वगळून 11.48 कोटी आहे.


किती कमाई झाली? 


संसदेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात अंतिम तारखेनंतरही ज्यांनी पॅन आणि आधार लिंक केले नाही, त्यांच्याकडून 1,000 रुपयांच्या दंडाच्या रकमेची वसुली करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यासंबंधित प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, 1 जुलै 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत ज्यांनी त्यांचे पॅन आधारशी लिंक केलेलं नाही त्यांच्याकडून 601.97 कोटी रुपये रक्कम दंड म्हणून जमा करण्यात आली आहे. पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 होती.


आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, जर करदात्यांनी त्यांची कागदपत्रे अंतिम मुदतीत आधारशी जोडण्यात अयशस्वी झाल्यास, पॅन कार्ड निष्क्रिय होतील. याव्यतिरिक्त, अशा पॅनवर कोणताही परतावा दिला जाणार नाही. बायोमेट्रिक दस्तऐवजासह पॅन लिंक करण्यात अयशस्वी झाल्यास टीडीएस आणि टीसीएस वजावट, कलेक्शनचे दर जास्त असतील. 1,000 रुपये उशीरा दंड भरून पॅन पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते.


पॅन कार्ड आधारशी कसे लिंक करावे?


ज्यांनी अंतिम मुदतीनंतरही आपला पॅन आणि आधार लिंक केले नाही ते 1,000 रुपये दंड भरून दोन्ही कागदपत्रे लिंक करून ते सक्रिय करू शकतात. ऑनलाइन प्रक्रियेनंतर, पॅन कार्ड पुन्हा सक्रिय होण्यासाठी सुमारे एक महिना लागेल.


पॅन-आधार ऑनलाईन कसे लिंक कराल? (How To Link PAN Card To Aadhaar) 


- ऑनलाईन लिंक करण्यासाठी https://incometaxindiaefiling.gov.in/ या लिंकला भेट देऊन आयकर ई-फायलिंग पोर्टल उघडा.
- जर याआधी नोंदणी केली नसेल तर सर्वात आधी नोंदणी करा. तुमचा पॅन क्रमांक हा तुमचा आयडी असेल.
- यानंतर User ID, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
- या ठिकाणी तुम्हाला एक पॉप अप विंडो दिसेल, तिथे तुम्हाला आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्यास सांगितले जाईल. जर पॉप अप विंडो आली नाही तर 'प्रोफाईल - सेटिंग्ज' वर जा आणि 'लिंक आधार' वर क्लिक करा.
- आता या ठिकाणी दिलेला तपशील तुमच्या आधार कार्डशी संबंधित जुळवा. जर हा तपशील जुळत नसेल, तर तुम्हाला चूक दुरुस्त करावी लागेल.
- जर तपशील जुळत असतील, तर तुमचा आधार क्रमांक टाका आणि "link now" बटणावर क्लिक करा.
- यानंतर तुमचं पॅन आधार कार्डशी लिंक झाला आहे याची खात्री देणारा एक पॉप-अप मेसेज दिसेल.
- तुमचं पॅन आधारशी लिंक करण्यासाठी तुम्ही https://www.utiitsl.com/ किंवा https://www.egov-nsdl.co.in/ ला देखील भेट देऊ शकता.


एसएमएसद्वारे कसे लिंग कराल?


- तुमच्या फोनवर UIDPAN टाईप करा.
- 12 अंकी आधार क्रमांक टाका.
- त्यानंतर 10 अंकी पॅन क्रमांक लिहा.
- आता 567678 किंवा 56161 वर मेसेज पाठवा.


ही बातमी वाचा: