Online Shopping : खरेदी म्हटलं की महिलांचे नाव समोर येतं, महिला आणि मुलींना खरेदीची आवड असून त्या यावर मोठा पैसा खर्च करतात असा सर्वसामान्य समज आपल्याकडे आहे. त्यातही आता ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढत असून त्यामध्येही महिलाच पुढे असल्याचं सांगितलं जातंय. पण हा सर्व समज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (IIM Ahmedabad) या संस्थेच्या अहवालाने खोटा ठरवला आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये महिलांपेक्षा पुरूषच आघाडीवर असून तेच यावर अधिकचा पैसा खर्च करतात असं हा अहवाल सांगतोय. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.


अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संशोधनात असं सांगण्यात आले आहे की, भारतीय पुरुष हे महिलांपेक्षा ऑनलाइन शॉपिंगवर जास्त पैसे खर्च करतात. या सर्वेक्षणात 25 राज्यांतील 35 हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता. 'डिजिटल रिटेल चॅनल्स अँड कन्झ्युमर्स: द इंडियन पर्स्पेक्टिव्ह' या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.


फॅशनवेअरवर खर्च अधिक


या अहवालात असं म्हटलंय की, 47 टक्के पुरुष आणि 58 टक्के महिला या फॅशनवेअर खरेदी करतात. तर 23 टक्के पुरुष आणि 16 टक्के या महिला इलेक्ट्रॉनिक उपकरणांची खरेदी करतात. जयपूर, लखनौ, नागपूर आणि कोची यांसारख्या टियर-2 शहरांतील ग्राहक दिल्ली, मुंबई आणि चेन्नई सारख्या टियर-1 शहरांतील ग्राहकांपेक्षा फॅशन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर अधिक खर्च करत आहेत.


पुरुष आणि महिला किती खर्च करतात?


टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार,  या संशोधनात सहभागी पुरुष सरासरी 2,484 रुपये खर्च करतात, तर महिला 1830 रुपये खर्च करतात. अशाप्रकारे ऑनलाईन शॉपिंगवर पुरुष हे महिलांच्या तुलनेत 36 टक्के जास्त पैसे खर्च करतात. ऑनलाईन शॉपिंगवर पुरूष जरी खर्च अधिक करत असतील तरी महिलांच्या तुलनेत ते कमी वेळ यासाठी घालवतात असंही समोर आलं आहे.


कॅश ऑन डिलिव्हरीवर अधिक भर


संशोधनात पुढे असं दिसून आलं आहे की टियर-2, टियर-3 आणि टियर-4 शहरांतील ग्राहक ऑनलाइन शॉपिंगवर अनुक्रमे 1,870 रुपये, 1,448 रुपये आणि 2,034 रुपये खर्च करत आहेत. तर टियर-1 शहरातील ग्राहकांनी 1,119 रुपये खर्च केले आहेत. फॅशन उत्पादने आणि कपडे खरेदी करताना, 87 टक्के ग्राहक पेमेंट पद्धत म्हणून कॅश ऑन डिलिव्हरीचा वापर करतात. कोविड-19 महामारीनंतर ऑनलाइन शॉपिंगच्या प्रमाणात लक्षणीयरीत्या वाढ झाली असल्याचं हा अहवाल सांगतोय. 


ही बातमी वाचा: