Onion News : सध्या राज्यातील कांदा (Onion) उत्पादक शेतकरी (Farmers) संकटात आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं कांदा पिकवण्यासाठी केलेला खर्च देखील निघणं कठीण झालं आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यातील दारफळ येथील एका शेतकऱ्याच्या कांद्याला अत्यंत कमी दर मिळाला आहे. या शेतकऱ्याच्या 93 कांद्याच्या पिशव्याची पट्टी फक्त 10000 रुपये आली आहे. पृथ्वीराज चव्हाण असं या शेतकऱ्याचं नाव असून, त्यांच्या कांद्याला प्रतिकिलो 1 ते 6 रुपयांचा दर मिळालाय.
मतदान झाल्यानंतर कांद्याच्या दरात घसरण
पृथ्वीराज चव्हाण या शेतकऱ्याने सोलापूर मार्केटमधील सूर्या लकी ट्रेडर्समध्ये 93 पोती कांदा विकला. या कांद्याची पट्टी फक्त 10000 रुपये आली. या पट्टीतून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही. आत्तापर्यंत शेतकऱ्याला कांद्यासाठी 60000 रुपयांचा खर्च आला आहे आणि उत्पादन फक्त 10000 रुपयांचे मिळाले आहे. दरम्यान, सोलापूर आणि माढा लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. हे मतदान झाल्यांतर कांदा भरायला सुरुवात केली होती. त्यानंतर 8 तारखेला रात्री कांदा बाजारात विक्रीसाठी नेला होता. 9 तारखेला कांद्याची विक्री करण्यात आल्याची माहिती शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
प्रतिकिलो कांद्याला 1 रुपये ते 6 रुपयांचा दर मिळाला
शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिकिलो कांद्याला 1 रुपये ते 6 रुपयांचा दर मिळाला आहे. चांगल्या प्रतिचा एक नंबरच्या कांद्याला 625 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तर दोन नंबरच्या कांद्याला 300 रुपये प्रतिक्विंटल, तीन नंबरच्या कांद्याला 200 रुपये प्रतिक्विंटल तर चार नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 100 रुपयांचा दर मिळाल्याची माहिती शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान, या कांद्याची पावती सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
वादळात आधीच कांद्याचे मोठं नुकसान झाले होते.
शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, माझा कांदा लागवडीसह काढणीला मोठा खर्च झाला होता. मात्र, मिळालेल्या पैशातून हा खर्च देखील निघाला नसल्याची खंत चव्हाण यांनी बोलून दाखवली. दीड एकर क्षेत्रावर कांद्याची लादवड केली होती. वादळात आधीच कांद्याचे मोठं नुकसान झाले होते. त्यात पुन्हा दरात घसरण झाल्यानं मोठा फटका बसल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली
शेतकऱ्यावर कठीण परिस्थिती
निवडणुकीच्या तोंडावर केंद्र शासनाने निर्यातबंदी उठवली म्हणून नुसता बोभाटा केला. निवडणूक होईपर्यंत भाव हजार, बाराशे टिकवून ठेवला. मात्र, निवडणूक संपताच भाव फक्त 100 रुपयांवर दर आला असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. अत्यल्प पावसामुळे अपुरे पाणी, प्रचंड ऊन, मधेच झालेली गारपीट अशा कठीण परिस्थितीतून 60 हजार खर्च करून दीड एकर कांदा जगवला आणि पट्टी फक्त 10 हजार रुपये आल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे. शेतकरी हतबल झालेत, उजनी आटल्याने नदी कोरडी ठाक आहे. पाण्याअभावी नवीन लागवडीचा 10 एकर ऊस देखील रोटरून टाकलाय. लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.अशात कांद्यावरच आशा होती. मात्र कांद्याने सुद्धा रडवल्याची माहिती शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
शासनाच्या असंवेदनशील धोरणांमुळं जगणं मुश्किल
सध्या जिवघेणा दुष्काळ आहे. पाण्याची टंचाई आहे. ऊन प्रचंड आहे. दररोज दोन तास सुध्दा मोटर चालत नाही.अशा प्रतिकूल परिस्थितीत 60 हजार रुपये खर्चून जगवलेला कांद्याची अक्षरशः माती झाली. ऊस मोडून टाकल्यामुळं कांद्याचे चार पैसे होतील अशी आशा होती. मात्र शासनाच्या असंवेदनशील धोरणांमुळं जगणं मुश्किल झालंय. त्यामुळं शासनाने प्रती क्विंटल 1000 रुपये अनुदान देऊन दिलासा द्यावा असे मत शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या:
Dindori Loksabha : नाशकात भर निवडणुकीत दीर आणि भावजयची भेटीची चर्चा; वैर संपुष्टात येणार का?