Onion Price :  भारत सरकारने 1 एप्रिलपासून कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याची घोषणा केली आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने या निर्णयाशी संबंधित अधिसूचना जारी केली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करणे हा या निर्यात शुल्काचा मुख्य उद्देश होता. याशिवाय या निर्णयामुळे कांदा निर्यातदार आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाजारपेठेत कांद्याला किती दर मिळतोय, यासंदर्भातील माहिती घेऊयात. 


निर्यात शुल्क आणि बदल


यापूर्वी, कांद्यावर 20 टक्के निर्यात शुल्क लागू होते, तसेच किमान निर्यात किंमत (MEP) आणि 8 डिसेंबर 2023 ते 3 मे 2024 पर्यंत निर्यात बंदी लागू होती. देशांतर्गत बाजारात कांद्याच्या किमती नियंत्रित करणे आणि त्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करणे हे त्याचे उद्दिष्ट होते. आता सरकारने हे 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, जो 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल. यामुळे निर्यातदार आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.


निर्यात आणि किंमतीतील चढउतार


कांद्याचा प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या भारताने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 17.17 लाख मेट्रिक टन (LMT) कांद्याची निर्यात केली आणि 2024-25 मध्ये हा आकडा 11.65 LMT पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. कांदा निर्यातीत अनेक चढ-उतार आले आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये, कांद्याची मासिक निर्यात 0.72 LMT होती, तर जानेवारी 2025 पर्यंत ती 1.85 LMT झाली. निर्यात शुल्क हटवल्यानंतर यात वाढ होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.


शेतकरी आणि ग्राहकांमध्ये समतोल साधणे हे सरकारचटं उद्दिष्ट


शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्या हितसंबंधांमध्ये समतोल साधणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची रास्त किंमत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, तसेच कांद्याचे भाव सर्वसामान्यांना परवडणारे होणार नाहीत याचीही काळजी घेते. रब्बी हंगामातील नवीन पीक आल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. बाजारपेठेत किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही जास्त असल्या तरी, अखिल भारतीय भारित सरासरी मॉडेल कांद्याच्या किमतीत 39 टक्के आणि किरकोळ किमतीत 10 टक्के घट दर्शवते.


कांद्याला सध्या किती मिळतोय दर?


बाजारात कांद्याची आवक वाढल्याने भाव घसरले आहेत. विशेषत: लासलगाव, पिंपळगाव या महाराष्ट्रातील प्रमुख मंडयांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. 21 मार्च 2025 रोजी लासलगावमध्ये 1330 रुपये प्रति क्विंटल आणि पिंपळगावमध्ये 1325 रुपये प्रतिक्विंटल कांद्याची किंमत नोंदवली गेली.


यंदा कांद्याचे विक्रमी उत्पादन 


यावेळी भारतातील रब्बी कांद्याचे उत्पादन विक्रमी पातळीवर होण्याची अपेक्षा आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या मते, यावर्षी रब्बी कांद्याचे उत्पादन 227 लाख मेट्रिक टन (एलएमटी) असल्याचा अंदाज आहे, जे गेल्या वर्षीच्या 192 लाख मेट्रिक टनापेक्षा 18 टक्के अधिक आहे. हे उत्पादन भारताच्या एकूण कांद्याच्या पुरवठ्यापैकी 70-75 टक्के आहे. या उत्पादनामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खरीप पिकाची आवक होईपर्यंत बाजारपेठ स्थिर राहील. ऑगस्ट 2023 पासून देशाला कांद्याचे कमी उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारात चढ्या भावाचा सामना करावा लागत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. आता रब्बी पिकाचे चांगले उत्पादन झाल्याने कांद्याच्या भावात स्थिरता आणि दिलासा अपेक्षित आहे.