Onion News : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात घसरण होत आहे. मागील 24 तासात कांद्याच्या दरात 150 रुपयांची घसरण झाली आहे. याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तर दुसरीकडं देशातील किरकोळ बाजारात लसूण 600 रुपये किलो दराने विकला जात आहे. मात्र कांद्याच्या दरात मोठी चढउतार पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावात कांद्याच्या दरात घसरण झाली आहे.
कांदा निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना फटका
कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. कांद्याचे दर वाढू नयेत म्हणून सरकारनं कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय लागू केला आहे. यामुळं कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून कांद्यावरील निर्यातबंदी उटवल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, कांद्यावरील निर्यातबंदी उठवली नसल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे. 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम राहणार असल्याची भूमिका सरकानं घेतली आहे. त्यामुळं कांद्याचे दर वाढण्याची शक्यचा कमीच असल्याचं बोललं जात आहे.
1800 रुपये प्रति क्विंटलने जाणारा कांदा आता1650 रुपयांवर
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ही देशातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे.या बाजारपेठेत कांद्याचे दर घसरले आहेत. 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम राहणार असल्याची भूमिका सरकारनं स्पष्ट केली. त्यायानंतर कांद्याच्या भावात घसरण होऊन भाव 150 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले आहेत. वाढून 1,800 रुपये प्रति क्विंटलने जाणारा कांदा आता 1600 ते 1650 रुपयांवर आला आहे. दरम्यान, 19 फेब्रुवारीला लासलगाव मंडईत घाऊक कांद्याचा भाव 40.62 टक्क्यांनी वाढून 1,800 रुपये प्रति क्विंटल झाला होता. 17 फेब्रुवारीला हाच भाव 1,280 रुपये प्रतिक्विंटल होता. मंगळवारी सरकारने कांदा निर्यातीवर बंदी कायम राहणार असल्याचे जाहीर केल्यावर कांद्याचा लिलाव भाव प्रति क्विंटल 150 रुपयांनी घसरून 1650 रुपयांवर आला आहे. या काळात बाजारात साडेआठ हजार क्विंटल कांद्याचा सौदा झाला. दरम्यान, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात कांद्याचे भाव वाढले होते. मात्र, कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याबाबत कोणताही सरकारी प्रस्ताव किंवा घोषणा नसल्यामुळं ते ठप्प झाले आहेत.
लसणाच्या दरात मोठी वाढ
एका बाजूला कांद्याच्या दरात घसरण होत असताना दुसऱ्या बाजूला देशातील किरकोळ बाजारात लसणाचा भाव 600 रुपये किलोवर पोहोचला आहे. देशातील लसणाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गुजरातमधील जामनगर मंडीमध्ये गेल्या काही दिवसांत लसणाची घाऊक किंमत प्रति किलो 350 रुपयांच्या वर गेली आहे. अशा स्थितीत त्याचे किरकोळ भाव 500 ते 550 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले असून अनेक भागात 600 रुपये किलोपर्यंत भाव आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लसणाचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे बाजारात नवीन पिकांची आवक कमी आहे. जुन्या पिकांचा साठा संपला आहे. त्यामुळे त्याच्या किमतीत मोठी झेप आहे.
महत्वाच्या बातम्या: