मुंबई : ओला इलेक्ट्रिकला सातत्यानं धक्का बसत आहे. आज बाजार सुरु होताच ओला इलेक्ट्रिकचे शेअर 3 टक्क्यांनी घसरले आहेत. ओला इलेक्ट्रिक शेअर बाजारात कामकाज सुरु झालं तेव्हा 68.81 रुपयांवर होता. बाजारातील सुरुवातीपासूनच शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. 9.50 मिनिटांनी ओला इलेक्ट्रिकचा शेअर 67.50 रुपयांवर पोहोचला होता. काही काळानंतर शेअर 67.85 रुपयांवर पोहोचला.
ओला इलेक्ट्रिकचा शेअर सलग चौथ्या दिवशी घसरला आहे. 87 लाख शेअर्सची विक्री झाली आहे. ओला इलेक्ट्रिक कंपनीला शेअर बाजारातून धक्के बसत आहेतच. याशिवाय इतरही धक्के बसत आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून ओला इलेक्ट्रिकला नोटीस देण्यात आली आहे. सीपीपीएच्या रिपोर्टच्या आधारे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं कर्नाटक उच्च न्यायालयात ओला इलेक्ट्रिककडून सुनावणी सुरु आहे.
तिसऱ्या तिमाहीत 564 कोटी रुपयांचा तोटा
ओला इलेक्ट्रिकला 2024-25 या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत 564 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं आहे. भाविश अग्रवाल यांच्या मालकीची ओला इलेक्ट्रिक ही कंपनी आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये इतर कंपन्यांकडून होणारी स्पर्धा आणि ग्राहक सेवांबाबतच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी होणाऱ्या खर्चामुळं ओला इलेक्ट्रिकला नुकसान होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत कंपनीला 376 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलंहोतं.
तिसऱ्या तिमाहीत ओला इलेक्ट्रिकला 1045 कोटींची कमाई झाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत कंपनीची कमाई 1296 कोटी होती. तिसऱ्या तिमाहिती 1505 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
ऑक्टोबर ते डिसेंबर ही तिमाही अशी आहे यामध्ये दिवाळी सारखे महत्त्वाचे सण असतात. या सणांच्या काळात देखील ओला इलेक्ट्रिकला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. ऑक्टोबरमध्ये कंपनीकडून इलेक्ट्रिक वाहनांची चांगल्या प्रकारे विक्री करता आली. मात्र,सरासरी कामगिरी समाधानकारक नव्हती. कंपनीनं त्यांच्या सेवे संदर्भातील त्रुटी दूर केल्या आहेत. कंपनीचा तोटा वाढल्यानं शेअरधारकांनी विक्रीला सुरुवात केली.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)