मुंबई : भारताचा रुपया अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत घसरत असल्याचं पाहायला मिळतं. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. आज रुपयामध्ये आणखी घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया  आज 87.92 रुपयांवर घसरला. शुक्रवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 87.43 रुपयांवर बंद झाला होता. आज देखील त्या घसरणीचा ट्रेंड सुरु आहे. 

भारताचा रुपया का घसरला?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर टॅरिफ लादणार असल्याची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर मेक्सिको, कॅनडा आणि चीन आहेत. ट्रम्प यांनी पहिल्या टप्प्यात या देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता स्टील आणि अॅल्युमिनिअमच्या वस्तूंच्या आयातीवर  देखील टॅरिफ लावण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे. ट्रम्प यांनी चार्ज स्वीकारल्यानंतर डॉलर मजबूत होत आहे. यामुळं विदेशी गुंतवणूकदार संस्था विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये पैसे लावण्याऐवजी अमेरिकेत गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत. 

रेपो रेट घटवून देखील रुपया घसरला?

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी 7 फेब्रुवारीला आरबीआयचं पतधोरण जाहीर केलं. पतधोरणविषयक समितीची बैठक पार पडल्यानंतर म्हलोत्रा यांनी रेपो रेट  25 बेसिस पॉईंटनं कमी करत असल्याची घोषणा केली होती. आरबीआयच्या पतधोरण विषयक समितीनं रेपो रेट 6.25 टक्के केल्यानंतर देखील रुपयावर परिणाम झाला नसल्याचं चित्र आहे. रुपयामध्ये घसरण सुरुच आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक भूमिका सुरुच

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमकपणानं निर्णय घेत टॅरिफ लावण्याची घोषणा केलीय. अध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला पुन्हा मजबूत करण्यासाठी आयातीवर टॅरिफ लावणार असल्याची घोषणा केली होती. कॅनडा, चीन अन् मेक्सिकोवर टॅरिफ लादण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्युमिनिअमच्या आयातीवर 25 टक्के टॅरिफ लावणार असल्याचं म्हटलं. आज डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ संदर्भातील निर्णय घेऊ शकतात.

विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय

अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्यानं विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून सावधगिरीचा  भाग म्हणून शेअर बाजारातून समभागांची विक्री करण्यात येत आहे. डिसेंबरमध्ये भारतीय शेअर बाजारातून 15 हजार कोटी, जानेवारीत  78 हजार कोटी तर फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत 7 हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत. 

इतर बातम्या : 

दीड लाख लाडक्या बहिणींकडून योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज, सरकारनं देखील घेतला मोठा निर्णय