चेन्नई: ओला (Ola) तामिळनाडू राज्यात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी स्थापन करणार आहे. त्यासाठी कंपनीकडून 2400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी ओलाने तामिळनाडू राज्य सरकारसोबत एक करार केला आहे. ओलाच्या या गुंतवणुकीमुळे तब्बल 10 हजार नव्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत.


ओलाच्या मते, ही फॅक्टरी जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी असणार आहे. सुरुवातीला या कंपनीकडून वर्षाला 20 लाख स्कूटर तयार होणार आहेत. नंतर या क्षमतेत वाढ करण्यात येणार आहे.


ओलाद्वारे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, या गुंतवणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नात योगदान देण्याचा ओलाचा प्रयत्न आहे. यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या क्षेत्रातील भारताची आयात कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच या गुंतवणुकीमुळे स्थानिक उत्पादनांना वाव मिळणार आहे आणि हजारो नव्या नोकऱ्या निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. येत्या वर्षभरात ओलाची ही फॅक्टरी तयार होण्याची आशा आहे.


परदेशातही स्कूटरची विक्री
ओलाचे या इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन जरी भारतात होणार असले तरी त्याची विक्री भारतासोबत युरोप, आशिया, लॅटिन अमेरिका तसेच जगातील अनेक देशांत होणार आहे अशी माहिती ओलाने दिली आहे. ओलाची पहिली स्कूटर 2022 सालच्या जानेवारीत भारतीय बाजारात येण्याची शक्यता आहे. या वर्षी मे महिन्यात ओलाच्या वतीनं अॅमस्टरडॅममधील कंपनी इटर्गो बीव्हीची खरेदी करण्यात आली होती. त्यावेळी ओलाने 2021 सालामध्ये भारतीय बाजारात इलेक्ट्रिक दुचाकी वाहन लॉन्च करण्याचं लक्ष ठेवलं होतं.


महत्वाच्या बातम्या: