New Labour Code : केंद्र सरकार 1 जुलैपासून नवीन कामगार संहिता (New Labour Code) लागू करण्याच्या तयारीत आहे. त्याच्या अंमलबजावणीमुळे नोकरदार लोकांसाठी अनेक गोष्टी बदलतील. नवीन कायद्याच्या अंमलबजावणीमुळे पीएफ (PF) आणि ग्रॅच्युइटीसारखे (Gratuity) सेवानिवृत्तीचे फायदे (Retirement Benefits) वाढतील.


याशिवाय साप्ताहिक सुट्याची पर्वणीही कर्मचाऱ्यांना मिळू शकते. सध्या असणारी एका आठवडी सुट्टीच्या बदल्यात दर आठवड्याला दोन ते तीन सुट्ट्या वाढू शकतात. ही संहिता लागू झाल्यानंतर, एखाद्या कर्मचाऱ्यानं नोकरी सोडल्यानंतर त्याला Full and Final Settlement साठी बराच काळ वाट पाहावी लागते. पण नवी संहिता लागू झाली तर, कर्मचाऱ्यांना दोनच दिवसांत कंपनीकडून पूर्ण पैसे मिळतील. सध्या, पूर्ण आणि अंतिम पेमेंटसाठी 30 ते 60 दिवसांचा कालावधी (सरासरी 45 दिवस) लागतो. 


दोन दिवसांत Full and Final Settlement


मीडिया रिपोर्ट्सनुसार, Full and Final Settlement बाबत असं सांगण्यात आलं आहे की, कर्मचार्‍यांना नोकरी सोडल्यानंतर, बडतर्फ केल्यानंतर किंवा कंपनीतून राजीनामा दिल्यानंतर दोनच दिवसांच्या आत पैसे द्यावे लागणार आहे. सद्यस्थितीत, वेतन देय आणि सेटलमेंटवर बहुतेक नियम लागू आहेत. मात्र, यामध्ये राजीनाम्याचा समावेश नाही. नवीन लेबर कोडमध्ये, इन-हँड सॅलरी  (In-Hand Salary) म्हणजेच, टेक होम सॅलरी (Take Home Salary) कमी होईल आणि कामाचे तास वाढतील. 


नवीन कामगार संहिता वेतन (Wage), सामाजिक सुरक्षा (Social Security), औद्योगिक संबंध (Industrial Relations) आणि व्यावसायिक सुरक्षितता (Occupational Safety) यांच्याशी संबंधित आहेत. केंद्र सरकारनं फेब्रुवारी 2021 मध्येच या चार संहितांचा अंतिम मसुदा तयार केला होता. आतापर्यंत 23 राज्यांनी या कायद्यांचे पूर्व-प्रकाशित मसुदे स्वीकारले आहेत. सर्व राज्यांनी एकाच वेळी हे चार बदल लागू करावेत, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे.


कामाचे तास वाढणार 


नवीन कामगार संहितेत आणखी एक महत्त्वाचा केला जाणार आहे. तो म्हणजे, कामांच्या तासांमध्ये होणारा बदल. त्यानुसार सरकारनं चार दिवस काम आणि आठवड्यात तीन सुट्या प्रस्तावित केल्या आहेत. यासोबतच दररोज कामाच्या तासांमध्ये वाढ करण्यास सांगण्यात आलं आहे. नवीन कामगार संहिता लागू झाल्यास दररोज 12 तास काम करावं लागेल. एका कर्मचाऱ्याला आठवड्यातून किमान 48 तास काम करावं लागेल, असा सरकारचा प्रस्ताव आहे.


याशिवाय पीएफमधील कर्मचाऱ्यांचे योगदान वाढणार आहे. कारण नवीन प्रस्तावानुसार, मूळ वेतनातील अर्धा भाग पीएफ म्हणून कापला जाणार आहे. त्यामुळे टेक होम पगार कमी होणार आहे. मात्र निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याला मोठी रक्कम मिळेल, जी वृद्धापकाळात मोठा आधार ठरेल. विशेषत: खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी याचा फायदा होणार आहे.