Direct Tax Collection : जूनमध्ये आतापर्यंत अॅडव्हान्स टॅक्स कलेक्शनमध्ये (Advance Tax Collection) चांगली वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या प्रत्यक्ष कर (Direct Tax) संकलनाची आकडेवारी चांगली असू शकते याचा अंदाज यावरुन बांधता येऊ शकतो. चालू आर्थिक वर्षात 17 जूनपर्यंत देशाचं निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 11.18 टक्क्यांनी वाढून 3.80 लाख कोटी रुपयं झालं आहे. अर्थ मंत्रालयाने रविवारी (18 जून) ही माहिती दिली. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी केंद्राचं प्रत्यक्ष कर संकलन 3,79,760 कोटी रुपये आहे तर मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत प्रत्यक्ष कर संकलन 3,41,568 कोटी रुपये होतं.


17 जूनपर्यंत अॅडव्हान्स टॅक्स कलेक्शनची आकडेवारी


अॅडव्हान्स टॅक्स कलेक्शनमुळे ही वाढ दिसून आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत 17 जूनपर्यंत अॅडव्हान्स टॅक्स कलेक्शन 1,16,776 लाख कोटी रुपये होतं. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 13.70 टक्क्यांनी अधिक आहे. अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की, "17 जूनपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 3,79,760 कोटी रुपये होतं, ज्यात कॉर्पोरेट कराच्या (CIT) 1,56,949 कोटी रुपयांचा समावेश आहे. सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्ससह (STT) वैयक्तिक आयकर म्हणून 2,22,196 कोटी रुपये जमा झाले आहेत."


39,578 कोटी रुपयांचा परतावा जारी


रिफंड अॅडजस्ट करण्यापूर्वी संकलन 4.19 लाख कोटी रुपये होतं. ही रक्कम वार्षिक आधारावर 12.73 टक्के वाढ दर्शवते. यामध्ये कॉर्पोरेट कराचे 1.87 लाख कोटी रुपये आणि सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्ससह वैयक्तिक आयकराचे 2.31 लाख कोटी रुपयांचा समावेश आहे. 17 जूनपर्यंत परताव्याची रक्कम 39,578 कोटी रुपये होती, जी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी अधिक आहे.






आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत अॅडव्हान्स टॅक्स कलेक्शन 13.7 टक्क्यांच्या वाढीसह 1,16,776 कोटी रुपये आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 1,02,707 कोटी रुपये होता. अॅडव्हान्स टॅक्स कलेक्शनमधील चांगली वाढ ही कराच्या कक्षेत आणखी वाढ होत असल्याचे संकेत आहेत.


हेही वाचा


Direct Tax Collection: सरकारचाही अंदाज चुकला! प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ, मागील आर्थिक वर्षात 16.61 लाख कोटी जमा