19th June Headlines: शिवसेनेचे यंदा दोन वर्धापन दिन सोहळे पार पडणार आहेत. शिवसेनेच्या 57 वर्षाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मिळाल्यानंतरही ठाकरे गटाकडून आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे दोन्ही गटांकडून आज शिवसेनेचे दोन वेगळे वर्धापन दिन साजरे होणार आहेत. दोन्ही गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. दसरा मेळाव्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत असा प्रसंग निर्माण होणार आहे. यासह आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे,


शिवसेना ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा 57 वा वर्धापन दिन आज षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी 6:30 वाजता पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातील पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. वर्धापन दिन सोहळ्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील सादर होणार आहे.


शिंदे गटाचा गोरेगावमधील नेस्को मैदानावर वर्धापन दिन


शिवसेना शिंदे गटाकडून गोरेगाव येथील नेस्को मैदानावर वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. बंडखोरीनंतर पहिल्यांदाच पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला जातोय. संध्याकाळी 7 वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरूवात होईल. दीड तास सत्य परिस्थितीवर नाट्यांतर असेल, त्यानंतर प्रमुख नेत्यांची भाषणं होतील. या कार्यक्रमासाठी प्रत्येक आमदाराला साधारण 300 कार्यकर्ते घेऊन यायला सांगितलं आहे. रात्री 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं भाषण होईल.


गणेश सहकारी साखर कारखाना संचालक पदाच्या जागेसाठी मतमोजणी


शिर्डी - आज गणेश सहकारी साखर कारखाना संचालक पदाच्या 19 जागांसाठी मतमोजणी होणार असून सकाळी 9 वाजता राहता तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस भाजप युती अशी लढत असून आजी-माजी महसूल मंत्र्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या बरोबर भाजपच्या विवेक कोल्हे यांनी युती केल्याने जिल्ह्याचं लक्ष निकालाकडे लागलं आहे.


पालखी सोहळा


ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज लोणंदमध्ये मुक्कामी असणार आहे. तर, तुकोबांची पालखी आज सणसर येथे मुक्कामी असणार आहे, या सोहळ्यात पहिलं रिंगण आज काटेवाडी येथे होणार आहे. आज मेंढ्यांचे गोल रिंगण होणार आहे.


बीड - पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काही दिवसापूर्वी पार पडली. त्यात पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्रित येऊन ही निवडणूक बिनविरोध काढली. सद्यस्थितीला पंकजा मुंडे यांचे या साखर कारखान्यांमध्ये 11 संचालक आहेत, तर धनंजय मुंडे गटाचे 10 संचालक आहेत. आज सकाळी वैधनाथ सहकारी साखर कारखान्याची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड होणार आहे.