National Stock Exchange : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने प्रति शेअर 42 रुपये लाभांश जाहीर केला आहे. शुक्रवारी 6 मे रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत मागील आर्थिक वर्षातील आर्थिक परिस्थितीचा विचार करून बोर्डाने हा निर्णय घेतल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.


बोर्डाने इतर गोष्टींबरोबरच 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी 4200% म्हणजेच ₹ 42/- प्रति इक्विटी शेअरच्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे. याशिवाय, कंपनीच्या संचालक मंडळाने व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) या पदांसाठी नावांची निवड केली आहे.


सीईओ विक्रम लिमये जूनमध्ये निवृत्त 


मार्चमध्ये स्टॉक एक्सचेंजने एमडी आणि सीईओ पदासाठी अर्ज मागवले होते. सध्याचे एमडी आणि सीईओ विक्रम लिमये यांचा कार्यकाळ या वर्षी जूनमध्ये पूर्ण होणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 मार्च 2022 होती. लिमये हे चार्टर्ड अकाउंटंट (CA) असून त्यांची 2017 मध्ये नियुक्ती झाली होती.


एनएसईचे माजी प्रमुख रवी नारायण यांचे प्रकरण


सिक्युरिटीज अपिलेट ट्रिब्युनल (SAT) ने माजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) प्रमुख रवी नारायण यांच्या विरोधात बाजार नियामक सेबीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. नारायण चार आठवड्यांच्या आत सेबीकडे 50 लाख रुपये जमा करतील या अटीच्या अधीन आहे. सॅटने गुरुवारी हा आदेश दिला. सॅटने आपल्या आदेशात जमा केलेली रक्कम अपीलच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून सेबी व्याज खात्यात ठेवली जाईल असं म्हटलं आहे.


दोन कोटींचा दंड


यापूर्वी सेबीने नारायण यांना नोटीस पाठवून 2.06 कोटी रुपये भरण्यास सांगितले होते. सेबीने कामकाजात चूक झाल्याच्या प्रकरणी ही नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये नारायण यांना इशारा देण्यात आला आहे की, 15 दिवसांच्या आत पैसे भरण्यात अयशस्वी झाल्यास त्यांच्यावर अटकेसह तसेच मालमत्ता आणि बँक खाती जप्त करण्याची कारवाई केली जाईल.


नारायण याआधी सेबीने त्यांच्यावर लावलेला दंड भरण्यात अपयशी ठरले होते, त्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली होती. 11 फेब्रुवारी रोजी, सेबीने नारायण यांना एनएसईमधील मुख्य धोरणात्मक अधिकाऱ्याच्या नियुक्तीमध्ये चूक केल्याबद्दल 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. याच प्रकरणात नारायण यांच्या उत्तराधिकारी चित्रा रामकृष्ण यांना बाजार नियामक सेबीने 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.


महत्वाच्या बातम्या :