Salman Khan House Firing :   बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी (Salman Khan House Firing ) आता राष्ट्रीय तपास यंत्रणेची (NIA) एन्ट्री झाली आहे. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींची आता एनआयएकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. 


सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मागील आठवड्यात दोन आरोपींना गुजरातमधून अटक केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी आरोपींनी नदीत फेकलेले पिस्तुल तापी नदीतून हस्तगत केले होते.  सलमान खान गोळीबार प्रकरणी अटकेत असलेले आरोपी विक्की गुप्ता आणि सागर पालची एनआयएच्या अधिकाऱ्यांनी  काही तास चौकशी केली. काही दिवसांपूर्वीच दिल्ली गुन्हे शाखेने या आरोपींची काही तास चौकशी केली होती. त्यानंतर आता एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आरोपींची चौकशी केल्याने वेगवेगळे तर्क लावले जात आहे. 


इतर राज्यातील पोलीस मुंबई पोलिसांच्या संपर्कात


इतर राज्यात लॉरेन्स बिष्णोई आरोपी असलेल्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. आता ह्याच गुन्ह्यांप्रकरणी आणखी काही धागेदोरे या अटकेतील आरोपींकडून मिळतात का, यासाठी गुन्हे नोंद असलेल्या राज्यातील पोलिसांकडूनही आरोपींची चौकशी करण्यात येणार आहे. या इतर राज्यातील पोलिसांनाही अटक आरोपींची चौकशी करायची असून ते मुंबई पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. 


पंजाबमधून दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक


सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांकडून वेगाने तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेकडून आरोपींना शस्त्र पुरवठा करणाऱ्या दोघांना पंजाबमधून अटक करण्यात आली आहे. सोनू उर्फ सुभाष चंदर (37 वर्षे) आणि अनुज थापन (32) अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. सोनू हा शेती करतो, आणि त्याचे किराणा दुकानही आहे. तर, अनुज थापन ट्रक हेल्पर म्हणून काम करतो, तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता, त्याच्यावर खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याचे गुन्हे दाखल आहेत.


गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या


14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर  गोळीबार केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलिसांना आरोपींचे चेहरे दिसले. या घटनेच्या 72 तासांच्या आत मुंबई पोलिसांनी गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या