Mumbai property registrations : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले. आता जरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी गेल्या काही काळापासून कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांचे नुकसान झाले. परंतु, सर्वात जास्त रोजगार देणाऱ्या बांधकाम क्षेत्रावर मात्र कोरोनाचा जास्त परिणाम झाला नसल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण मुंबईत मार्च 2022 मध्ये 15,717 घरांची मालमत्ता विक्री नोंदणी झाली. त्यातून सरकारला मिळणाऱ्या महसुलात तब्बल 51 टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्याच्या महसुलात 1,084 कोटीपेक्षा जास्त रक्कम यातून जमा झाली असल्याची माहिती नाईट फ्रँक इंडिया या रिअल इस्टेट कन्सल्टन्सीनं दिली आहे. 


बांधकाम क्षेत्रातील नाईट फ्रँक इंडिया या कंपनीने मार्च एन्डच्या निमित्तानं आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, मुंबईमध्ये मार्च 2022 मध्ये नोंदणीकृत घरांची संख्या दशकातील तिसरी सर्वोत्तम होती तर एका महिन्यात राज्य महसूल संकलन 10 वर्षांच्या उच्चांकावर होते. मार्च 2022 मध्ये  मध्यम आकाराची घरे (500-1000 चौरस फूट दरम्यान) सर्वाधिक विकली गेल्याची माहिती आहे. 


मुंबईत मार्च 2022 मध्ये तिसरी सर्वाधिक घरांची विक्री झाली. याआधी डिसेंबर 2020 आणि मार्च 2021 मध्ये अनुक्रमे 19,581 आणि 17,728 घरं विकली होती.  मार्च 2022 मध्ये फेब्रुवारी 2022 च्या तुलनेत मालमत्तेच्या नोंदणीमध्ये 51% वाढ नोंदवली गेली. मार्च 2021 च्या तुलनेत ही नोंदणी 11% कमी होती. 


मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या शहरांमध्ये 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार्‍या 1 टक्के मेट्रो उपकरामुळे मार्च 2022 काहीशी घर विक्रीला काहीशी गती मिळाली.  


नोंदणीसाठी दैनंदिन सरासरी 507 नोंदवली


मालमत्ता नोंदणीसाठी दैनंदिन सरासरी 507 नोंदवली गेली, जी गेल्या 12 महिन्यांतील सर्वोच्च आहे. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर मालमत्ता विक्री अजूनच वाढली. 1 ते 15 मार्च 2022 दरम्यान 415 तर शेवटच्या पंधरवड्यात 593 चा उच्चांक नोंदवला गेला. 


नाइट फ्रँक इंडिया कंपनीच्या आकडेवारीनुसार, मागच्या म्हणजे 2021 या वर्षात जानेवारी महिन्यात 10 हजार 412 मालमत्तांची नोंदणी झाली होती. मागच्या वर्षी फेब्रुवारी मध्ये 10 हजार 172, मार्च मध्ये 17 हजार 728, एप्रिलमध्ये 10 हजार 136 मे महिन्यात 5 हजार  366, जूनमध्ये 7 हजार 856, जुलैमध्ये 9 हजार 822, ऑगस्ट मध्ये 6 हजार 784, सप्टेंबरमध्ये  7 हजार 804, ऑक्टोंबर महिन्यात 8 हजार 576, नोव्हेंबर मध्ये 7 हजार 582 आणि डिसेंबर 2021 मध्ये 9 हजार  320 मालमत्तांची नोंदणी झाली होती. 


नाइट फ्रँक इंडिया कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशीर  बैजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर व्यवसाय वाढत आहे. ही वाढ थोड्या प्रमाणात असली तरी सकारात्मक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बाजारात अजून चांगली स्थिती पाहायला मिळेल, असे शिशीर बैजल यांनी सांगितले.