Multibagger Share: शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक करणं जोखमीचं मानलं जातं, पण असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांचं नशीब उजळवण्याचं काम केलं आहे. काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत मल्टीबॅगर रिटर्न्स (Multibagger Return) देऊन श्रीमंत केलं आहे, तर काही शेअर्सनी गुंतवणूकदारांची गुंतवणूक कमी वेळात अनेक पटींनी वाढवली आहे. असाच एक धमाकेदार शेअर म्हणजे, ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया लिमिटेडचा स्टॉक (Tube Investments of India Ltd). या शेअरनं अवघ्या पाच वर्षांत 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचं रूपांतर 10 लाख रुपयांमध्ये केलं आहे. या कालावधीत, स्टॉकनं मल्टीबॅगर रिटर्न देऊन आपल्या गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव केला आहे. 


पाच वर्षांत शेअर्सची किंमत वाढली


ट्यूब इन्वेस्टमेंट ऑफ इंडिया लिमिटेड (Tube Investments of India Ltd) च्या शेअर्सनं गेल्या पाच वर्षांत 299 ते 3,209 रुपयांपर्यंतचा मोठा प्रवास केला आहे. पाच वर्षांपूर्वी, 9 नोव्हेंबर 2018 रोजी ट्यूब इन्वेस्टमेंट ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीच्या एका शेअरची किंमत 299 रुपये होती आणि तेव्हापासून आतापर्यंत शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे, यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 970 टक्क्यांहून अधिक मल्टीबॅगर रिटर्न मिळाला आहे. मंगळवारी शेअर बाजारातील व्यवहाराअंती हा शेअर 2.16 टक्क्यांच्या वाढीसह 3209 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. म्हणजेच, या कालावधीत त्याची किंमत 2,909.10 रुपयांनी वाढली. 


गुंतवणूकदारांचं नशीब उजळलं 


आता या रिटर्नच्या आधारे गुंतवणूकदारांच्या पैशात झालेली वाढ पाहिली, तर एखाद्या गुंतवणूकदारानं पाच वर्षांपूर्वी जर Tube Investments of India Ltd च्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि ते आतापर्यंत ठेवले असतील, तर ही गुंतवणूक आता तब्बल 10 लाखांपर्यंत वाढली असती. जर आपण गेल्या सहा वर्षांचा विचार केला तर या स्टॉकमधून मिळणारा परतावा 1100 टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजेच, 6 वर्षांत 1 लाख रुपये 11 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता. 


अल्पावधीत गाठली मोठी मजल 


6,204 कोटी रुपयांचं बाजार भांडवल असलेल्या या कंपनीच्या शेअर्सचं मूल्य तर वाढलंच. पण या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 3,736 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 2,375 रुपये आहे. अल्पावधीतच या शेअरनं मोठी मजल मारली असून या शेअरचा समावेश मल्टीबॅगर स्टॉक्सच्या यादीत करण्यात आला आहे. या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवण्याचं काम केलं आहे. दरम्यान, ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया लिमिटेड ही एक भारतीय अभियांत्रिकी आणि उत्पादन कंपनी आहे, जी सायकल, धातूपासून तयार होणाऱ्या वस्तू आणि चैन (धातूच्या साखळ्या) तयार करते. या कंपनीचं मुख्यालय चेन्नई येथे आहे आणि ही मुरुगप्पा ग्रुपची कंपनी आहे. 


शेअरची सुरुवातीपासून आतापर्यंतची किंमत 


या शेअरच्या किमतीत गेल्या पाच वर्षांत झालेली वाढ पाहिली तर 9 नोव्हेंबर 2018 रोजी त्याची किंमत 299.90 रुपये होती, तर पुढच्याच वर्षी 8 नोव्हेंबर 2019 रोजी त्याची किंमत 438.45 रुपये झाली. त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी 6 नोव्हेंबर 2020 रोजी हा शेअर 689.15 रुपयांवर पोहोचला. ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडियाच्या शेअर्सचा वाढता ट्रेंड इथेच थांबला नाही, उलट तो आणखी वाढला आणि 4 नोव्हेंबर 2021 रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत 1,662.70 रुपये झाली. गेल्या वर्षी 11 नोव्हेंबर 2022 रोजी हा शेअर 2,573.15 रुपयांवर होता.


(टीप- शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या बाजारातील तज्ञांचा सल्ला घ्या.)