मुंबई : सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही योजने जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान, आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या बँक खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. कोणत्या महिलांना 4500 रुपये मिळणार? आता काही महिन्यांच्या बँक खात्यात 4500 रुपयांऐवजी 3000 रुपये का आले? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण सरकारने नेमके कोणाला पैसे दिले आणि पुढच्या महिन्यात कोणाला किती रुपये मिळणार? हे समजून घेऊ या... 


दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवण्यास सुरुवात


लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनच्या काही दिवसांआधी महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात झाली होती. या पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात आले. तसेच 31 ऑगस्टनंतर अर्ज करणाऱ्या महिलांनाही लवकरच या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल, असे सांगितले जाते. त्यानंतर आता या योजनेअंतर्गत निधीवाटपाचा दुसरा टप्पा चालू करण्यात आला आहे. त्याची सुरुवात आता प्रत्यक्ष झाली आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांच्या बँक खात्यावर तीन हजार रुपये आलेले आहेत, ते पैसे माझी लाडकी बहीण योजनच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठीचा लाभ आहे. 


दुसऱ्या टप्प्यात कोणाला पैसे दिले जात आहेत?


कोणत्या पात्र महिलेला 3000 रुपये मिळणार आणि कोणत्या महिलेला 4500 रुपये मिळणार? यासंदर्भात अनेक महिलांचा गोंधळ होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यात चालू झाली. ऑगस्ट महिन्यात या योजनेचा पुण्यातील एका कार्यक्रमात अधिकृतरित्या शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याच्या हिशोबाने पहिल्या टप्प्यात पात्र महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदर 3000 रुपये देण्यात आले. या पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत अर्ज भरलेल्या महिलांना पैसे देण्यात आले होते. आता या योजनेचा दुसरा टप्पा चालू झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यात 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे (प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये) 3000 हजार दिले जात आहेत. 


4500 रुपये कोणाला येणार? 


दरम्यान, ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये मिळालेले नाहीत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकूण 4500 रुपये दिले जातील. मात्र त्यासाठी तुमचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे. 


हेही वाचा :


Lek Ladki Yojana : 'लाडक्या बहिणीं'ना 1500 तर 'लाडक्या लेकीं'ना 101000; 'लेक लाडकी' योजना आहे तरी काय?