Muhurat Trading 2024 : या वर्षी दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. शेअर बाजारातही याचा उत्साह पाहायला मिळतोय. योग्य अभ्यास करून गुंतवणूक केल्यामुळे काही गुंतवणूकदार या काळात चांगलेच मालदार झाले आहेत. तर काही गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागलाय. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार मुहूर्त ट्रेडिंगची वाट पाहात होते. शेवटी आता तो क्षण आला आहे. आज शेअर बाजारावर मुहूर्त ट्रेडिंगचे विशेष सत्र राबवले जाणार आहे. 


मुहूर्त ट्रेडिंग नेमकी कधी?


या वर्षी एका तासासाठी मुहूर्त ट्रेडिंगचे सेशन चालणार आहे. भारतीय शेअर बाजाराच्या बीएसई आणि एनएसई या निर्देशांकांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार मुहूर्त ट्रेडिंग एक तास चालणार आहे. 1 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत हे स्पेशल सेशन चालेल. तर 7:10 वाजेपर्यंत गुंतवणूकदारांना ट्रेड मॉडिफिकेशन करता येणार आहे. 


मुहूर्त ट्रेडिंगचं महत्त्व काय?


भारतात स्टॉक ब्रोकर हे दिवाळीला त्यांच्या नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात आहे, असं मानतात. त्यामुळे मुहूर्त ट्रेडिंगमध्ये शेअर खरेदी केल्यास आगामी वर्षभरात चांगली समृद्धी येईल, असं अनेकजण मानतात. मुहूर्त ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणूकदार आपला पोर्टफोलिओ आणखी डायव्हर्सिफाय करू शकतात. मुहूर्त ट्रेडिंगच्या काळात गुंतवणूकदार मोठ्या उत्साहाने शेअर्सची खरेदी आणि विक्री करतात. मुहूर्त ट्रेडिंग अवघ्या एका तासाची असल्यामुळे या काळात शेअर बाजारात मोठे-चढउतार पाहायला मिळतात.  


आतापर्यंतच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये नेमकं काय झालं? 


याआधी मुहूर्त ट्रेडिंगच्या काळात अनेक गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स मिळालेले आहेत. मुहूर्त ट्रेडिंगमध्ये BSE Sensex गेल्या 17 सेशन्सपैकी साधारण 13 सेशन्समध्ये हिरव्या निशाणासह बंद झालेला आहे. याआधीच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये अनेक स्टॉक्सचे मूल्य वाढल्याचे पाहायला मिळालेले आहे. 


दरम्यान, 31 ऑक्टोबरचे सत्र लाल निशाणासह बंद झाले. सेन्सेक्स 553.12 अंकांच्या घसरणीसह 79389.06 रुपयांवर बंद झाला. तर निफ्टी 50 निर्देशांक 135.50 अंकांच्या किरकोळ घसरणीसह 24205.35 रुपयांवर बंद झाला. 


हेही वाचा :


ऐन दिवाळीत दिवाळं! गॅस सिलिंडर महागला, घरगुती गॅस सिलिंडरची नेमकी काय स्थिती?


नवा आयपीओ आला रे आला! जाणून घ्या प्राईस बँड किती? गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख काय?