Meta Employees:  जागतिक मंदीच्या सावटामुळे Google Layoffs, Microsoft Layoffs, Amazon इत्यादी सारख्या अनेक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी अनेक टप्प्यांत कर्मचाऱ्यांना नोकरीवर कमी केले आहे. यात मेटा कंपनीचाही समावेश आहे. मेटानेदेखील काही टप्प्यांत हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिला  आहे. त्यानंतर कंपनी अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आश्चर्यजनक निष्कर्ष समोर आले आहेत. कंपनीतील अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांचा मार्क झुकरबर्गच्या नेतृत्वावर विश्वास नाही. मेटा ही  फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आदी कंपन्यांची मूळ कंपनी आहे. मार्क झुकरबर्ग हे कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. 


26 टक्के कर्मचाऱ्यांचा झुकरबर्गवर विश्वास 


वॉल स्ट्रीट जनरलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या कंपनीच्या केवळ एक चतुर्थांश कर्मचाऱ्यांचा म्हणजेच 26 टक्के लोकांना मार्क झुकरबर्गच्या नेतृत्वावर विश्वास आहे. हे सर्वेक्षण 26 एप्रिल ते 10 मे दरम्यान, नोकर कपातीच्या शेवटच्या फेरीच्या आधी केले गेले. याआधी ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात हा आकडा 31 टक्के इतका होता. अशा स्थितीत सीईओ मार्क झुकरबर्गने आणखी 5 टक्के कर्मचाऱ्यांचा विश्वास गमावला आहे. 


74 टक्के कर्मचारी झुकरबर्गवर नाराज का?


मार्क झुकरबर्गने  मागील वर्षापासून 21,000 हून अधिक मेटा कर्मचार्‍यांना टप्प्याटप्प्याने कमी केले आहे. पहिल्यांदा नोव्हेंबर 2022 मध्ये, कंपनीने खर्च कमी करण्यासाठी 13 टक्के म्हणजेच 11,000 कर्मचार्‍यांना कामावरून काढले होते. त्यानंतर, 2023 मध्ये, कंपनीने एकूण 10,000 कर्मचारी काढून टाकण्याची (Meta Layoffs) घोषणा केली. ही नोकर कपात अनेक टप्प्यांत करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांवर मानसिक दडपण वाढले आहे. अशा परिस्थितीत कंपनीच्या अंतर्गत सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे की, या नोकर कपातीमुळे कंपनीचे 74 टक्के कर्मचारी झुकेरबर्ग यांच्या नेतृत्वावर खूश नाहीत.


कर्मचाऱ्यांना कामावर न येण्याचे ई-मेल पाठवले


मेटा कंपनीने मे महिन्यात 10,000 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला असून या कर्मचाऱ्यांना तशा नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मेटाने ही घोषणा मार्चमध्येच केली होती. आतापर्यंत जवळपास 5,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवर न येण्याचे ई-मेल पाठवण्यात आल्याची माहिती आहे. 


या कर्मचारी कपातीनंतर मेटामधील कर्मचाऱ्यांची संख्या 2021 सालच्या मध्यापर्यंत जितकी होती, तितकी होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर कंपनीने मोठी नोकरभरती केली होती. मेटा कंपनीने आता प्रोफेशनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म LinkedIn च्या माध्यमातून या कपातीची माहिती दिली आहे. 


आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर टेक कंपन्यांनी यावर्षी मोठी नोकरकपात केली आहे. अॅक्सेंचर (Accenture), अॅमेझॉन (Amazon), मेटा (मेटा) आणि इतर टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरकपातीच्या घोषणा केल्या आहेत. अॅमेझॉनने 27 हजार, मेटाने 21 हजार, अॅक्सेंचरने 19 हजार, मायक्रोसॉफ्ट 10 हजार, अल्फाबेट 12 हजार, सेल्फफोर्स 8 हजार, एचपी 6 हजार, आयबीएम 3 हजार 900, ट्विटर 3 हजार 700 आणि सेगागेट कंपनीने 3 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे.