Global Health and Bikaji Foods Listing: शेअर बाजारात पडझड सुरू असताना दुसरीकडे आज दोन कंपन्यांची बाजारात लिस्टिंग झाली. मेदांता या ब्रॅण्ड अंतर्गत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवणारी 'ग्लोबल हेल्थ' (Global Health) कंपनी आणि खाद्यपदार्थ तयार करणारी बिकाजी फूड्स इंटरनॅशनल (Bikaji Foods International) कंपनीने बुधवारी बाजारात दमदार एन्ट्री केली. शेअर बाजारात लिस्टिंग होताच या दोन कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. मुंबई शेअर बाजारात ग्लोबल हेल्थ 398.15 रुपयांवर सूचीबद्ध (Global Health Listing) झाला. तर, बिकाजी फूड्स 321.15 रुपयांवर (Bikaji Foods International Listing) सूचीबद्ध झाला.


बिकाजी फूडसच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला होता.  एनएसईवर बिकाजी फूडस् 323 रुपयांवर सूचीबद्ध झाला. आयपीओ मिळालेल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 21 आणि 23 रुपयांचा नफा मिळाला. एनएसईवर बिकाजी फूड्सने सुरुवातीच्या टप्प्यात 334.70 रुपयांचा उच्चांक गाठला. बिकाजी फूड्सचा शेअर दर 11 टक्क्यांनी वधारला होता. 


ग्लोबल हेल्थनेदेखील गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ चांगलाच 'हेल्दी' केला. ग्लोबल हेल्थच्या शेअर दरात बीएसईवर 20 टक्क्यांनी वधारत 404.05 रुपयांवर पोहचला होता. आज या शेअरने 414.90 रुपयांचा उच्चांक गाठला.  


ग्लोबल हेल्थ आयपीओला प्रतिसाद 


ग्लोबल हेल्थ आयपीओला गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला. या आयपीओतून 2200 कोटी रुपये उभारण्याचा मानस कंपनीने व्यक्त केला होता. आयपीओसाठी प्रति शेअर किंमत 319-336 रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती. तर, एका लॉटमध्ये 44 शेअर्स देण्यात आले होते. 'ग्लोबल हेल्थ'चा आयपीओ 10 पटीने सब्सक्राइब झाला होता.


ग्लोबल हेल्थ कंपनीने देशभरातील अनेक शहरांमध्ये मेदांता रुग्णालये सुरू केली आहेत. या रुग्णालयांमध्ये विविध आजारांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत.  गुरुग्राम, इंदूर, रांची, लखनौ आणि पाटणा येथे मेदांता ब्रँड अंतर्गत ही रुग्णालये आहेत. प्रसिद्ध कार्डिओ सर्जन डॉ. नरेश त्रेहान यांनी 2004 मध्ये मेंदांता ब्रँड नावाने हॉस्पिटलची एक साखळी सुरु केली होती. 


बिकाजी फूड्सला कसा मिळाला प्रतिसाद


बिकाजी फूड्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. 26.67 पटीने आयपीओ सब्सक्राइब झाला. आयपीओत प्रति शेअरची किंमत 285-300 रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती. ग्रे मार्केटमध्येही बिकाजी फूडसचा शेअर प्रीमियम दरावर लिस्ट होईल असे संकेत होते. 


बिकाजी फूड्स लिमिटेड कंपनी 250 हून प्रकारची नमकिन तयार करते. उत्तर भारतापासून ते ईशान्य भारतातील राज्यांमधील बाजारपेठेत बिकाजी फूड्स प्रमुख कंपनी आहे. नमकिन शिवाय  पापड, फ्रोझन फूड आणि कुकीजदेखील ही कंपनी तयार करते. बिकाजीचे वितरणाचे जाळे विस्तारत असून एफएमसीजी सेक्टरमध्ये तेजीने वाढ होत आहे.