LPG Price Hike : महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सामान्यांना आणखी झळ बसण्याची भीती आहे. देशात घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. इंधन कंपन्यांकडून उद्या एक जून रोजी नवीन एलपीजी सिलेंडर गॅसचे दर जाहीर होणार आहेत. एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 1100 रुपयांहून अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


मे महिन्यात दोनदा दरवाढ 


इंधन कंपन्यांनी मे महिन्यात दोन वेळेस एलपीजी गॅसची दरवाढ केली होती. इंधन कंपन्यांनी 7 मे रोजी 50 रुपयांची दरवाढ केली होती. त्यानंतर 19 मे रोजी 3.5 रुपयांची दरवाढ केली. मे महिन्यात 53.5 रुपये वाढवण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचे दर वाढल्याने भारतातही दरवाढ होण्याची भीती आहे. 


सध्या दर काय?


सध्या दिल्लीत घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडर दराची किंमत 1003 रुपये, मुंबईत 1002.5 रुपये, कोलकातामध्ये 1029 रुपये आणि चेन्नईत 1058 रुपये इतकी आहे. व्यावसायिक वापरासाठी असलेल्या 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरातही 102 रुपयांची दरवाढ झाली होती. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा दर 2000 रुपयांहून अधिक आहे. 


गॅसचे दर कसे ठरतात?


देशातील एलपीजी गॅसची किंमत ही इम्पोर्ट पॅरिटी प्राइसने ठरवली जाते. याला IPP असे म्हणतात. भारत बहुतांशी गॅसचा पुरवठा आयातीद्वारे पूर्ण केला जातो. त्यामुळे IPP देखील आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीद्वारे निश्चित होतो. सौदी अरेबियाच्या 'अरमाको' कंपनीच्या एलपीजी गॅस किंमतीच्या आधारे भारतातील गॅस दर निश्चित होतात. एलपीजीच्या किंमतीमध्ये गॅसचा दर, कस्टम ड्युटी, वाहतूक खर्च, विमा आदी घटकांचा समावेश आहे. 


या कारणांचाही होतो परिणाम


आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमतीचा परिणाम देशातील गॅस दरावर होतो. मात्र, त्याशिवाय, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरणदेखील गॅसच्या दरावर परिणाम करते. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये व्यवहार केला जातो. डॉलरच्या तुलनेत होत असलेल्या घसरणीमुळे भारताला अधिक किंमत मोजावी लागत आहे.