LIC : भारतीय शेअर बाजारातून भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) चांगलाच नफा कमावला आहे. एलआयसीने शेअर बाजारातून 42 हजार कोटींचा नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षात एलआयसीची ही कमाई झाली आहे.  त्याआधी वर्ष 2020-21 मध्ये एलआयसीने 36 हजार कोटींचा नफा कमावला होता.


LIC ही भारतातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापक आहे. एलआयसीच्या अखत्यारीत अब्जावधींची मालमत्ता आहे. त्याशिवाय एलआयसी ही भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी गुंतवणुकदार संस्था आहे. एलआयसीकडून जवळपास 25 टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक होते, असे एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक राज कुमार यांनी सांगितले. 


कुमार यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीच्या निकालाची तुलना मागील वर्षाच्या तिमाहीशी करता येणार नाही. एलआयसीने सप्टेंबर 2021 पासून तिमाही नफा नोंदवण्यास सुरुवात केली.  आर्थिक वर्ष 2021-22 आणि 2020-21 मधील चौथ्या तिमाहीच्या निकालाची तुलना होऊ शकत नाही असेही त्यांनी म्हटले. 


कुमार यांनी सांगितले की आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये  कोरोना महासाथीमुळे आणि काही पॉलिसींची मॅच्युअरिटीच्या क्लेम पैसे मोठ्या प्रमाणावर वितरीत करण्यात आले आहे. चार पॉलिसी मॅच्युअर झाल्याने त्यांच्या दाव्याचे पैसे द्यावे लागले असल्याचे त्यांनी सांगितले. 


दरम्यान,  शेअर बाजारातील गुंतवणुकीतून एलआयसीने चांगली कमाई केली असली तरी कंपनी बाजारात लिस्ट झाल्यानंतर गुंतवणुकदारांना फटका बसला आहे. एलआयसीच्या शेअर दरात घसरण होत असून संचालक मंडळाने मोठा लाभांशही दिला नाही. अवघा 1.5 रुपयांचा लाभांश एलआयसीने जाहीर केला आहे. 


या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत एलआयसीने विमा प्रीमियममधून 1,44,158.84 कोटींची कमाई केली. मागील वर्षी या तिमाहीत  1,22,290.6 उत्पन्न मिळाले होते. जवळपास 17.88 टक्क्यांनी प्रीमियमद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: