LIC Share News :  देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअर दरात घसरण सुरू असल्याचे चित्र आहे. एलआयसीच्या चौथ्या तिमाहीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या तिमाहीतील निकालाचे परिणाम एलआयसीच्या शेअरवर दिसून आले. त्यामुळे एलआयसीचे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. 


सोमवारी एलआयसीने आपला जानेवारी-मार्च या दरम्यानचा तिमाही निकाल जाहीर केला. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी एलआयसीच्या निव्वळ नफ्यात 17.41 टक्क्यांची घट झाली आहे. एलआयसीला यंदाच्या तिमाहीत 2409.39 कोटी नफा झाला आहे. मागील वर्षी जानेवारी-मार्चच्या तिमाही दरम्यान एलआयसीला 2917.33 कोटी रुपयांचा नफा झाला होता. 


या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत एलआयसीने विमा प्रीमियममधून 1,44,158.84 कोटींची कमाई केली. मागील वर्षी या तिमाहीत  1,22,290.6 उत्पन्न मिळाले होते. जवळपास 17.88 टक्क्यांनी प्रीमियमद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली आहे. 


गुंतवणुकीतील नफ्यात वाढ


एलआयसीला चौथ्या तिमाहीत गुंतवणुकीतून 67,855.59 कोटी रुपयांची कमाई झाली. मागील वर्षी याच चौथ्या तिमाहीच्या काळात गुंतवणुकीतून 67,684.27 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. 


लाभाशांचा फुसका बार


एलआयसी शेअर बाजारात लिस्ट होताना 949 रुपये प्रति शेअर इतकी किंमत निश्चित करण्यात आली होती. मात्र, जवळपास 9 टक्क्यांच्या डिस्काउंट दरात शेअर लिस्ट झाला. त्यानंतर शेअर दरात घसरण सुरू आहे. गुंतवणुकदारांना फायदा व्हावा यासाठी एलआयसी संचालक मंडळाकडून लाभांश मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, संचालक मंडळाने प्रति शेअर 1.5 रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. 


शेअर दरात घसरण


एलआयसीने जाहीर केलेल्या तिमाही निकालानंतर आज शेअर दरात घसरण दिसून आली. आज सकाळी एलआयसीच्या शेअर दराने 810 रुपयांचा नीचांकी दर गाठला. त्यानंतर शेअर दर काही प्रमाणात सावरल्याचे दिसून आले. एलआयसीच्या शेअर दरात 2.34 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.