Layoffs in January :  गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जगभरातल्या मिळून तब्बल 217 कंपन्यांनी नोकरकपात (Layoff) केली. आणि त्यानंतर जगात महामंदी येणार अशी चर्चा सुरु झाली. तसा अंदाजही अनेकांनी वर्तवला. नोव्हेंबरमध्ये ज्या पद्धतीनं नोकऱ्या गेल्या, त्याच पद्धतीनं नोकरकपातीचा ट्रेण्ड जानेवारीच्या पहिल्या 15 दिवसांमध्येही दिसला आहे. कारण जानेवारी 2023 च्या पहिल्या 15 दिवसांमध्ये जगभरातील 91 कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. 


जगभरात मोठ्या धुमधडाक्यात  नव्या वर्षांचं स्वागत झालं. पण, हे सेलिब्रेशन फार काळ टिकलं नाही. कारण, 2023 च्या सुरुवातीला आयटी क्षेत्रातल्या अनेकांचा रोजगार गेला आहे. गेल्या वर्षाच्या शेवटीच जगात जागतिक मंदीचा अंदाज वर्तवला जात होता आणि अगदी तशीच सुरुवात झाली आहे.  जानेवारी महिन्याच्या  पहिल्या पंधरा दिवसांची आकडेवारी पाहिली तर तब्बल  24 हजार 151 आयटी कर्मचाऱ्यांचा रोजगार गेला आहे.  लेऑफ.एफवायआय या वेबसाईट्सच्या माहितीनुसार जगभरातल्या क्रिप्टो करन्सीमध्ये महत्वाच्या कंपन्यापैकी एक अशा क्रिप्टो.कॉम या कंपनीनं 20 टक्के कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.  इतकंच नाही तर अॅमेझॉन, सेल्सफोर्स, कॉईनबेस सारख्या कंपन्यामध्येही मोठी नोकरकपात होण्याची शक्यता आहे. 


दुसरीकडे आधीच 10 हजार जणांना घरी बसवणाऱ्या अॅमेझॉनमधून आणखी 18 हजार जणांची कपात होणार आहे. इतकंच नाही तर अॅमेझॉननं नवीन नोकर भरतीवरही ब्रेक लावला आहे. तर तिकडे शेअर चॅट कंपनीनं तर गेल्या 40 दिवसांमध्ये 600 जणांना घरी बसवले आहे. ओला कंपनीनं 200 जणांना कामावरुन कमी केलं आहे.


  गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये कोणकोणत्या कंपन्यामधून कर्मचारी कपात झाली


ट्विटर



  • एलॉन मस्क यांनी कंपनी ताब्यात घेतल्यापासून साधारण 50  टक्के कर्मचारी कपात केली


नेटफ्लिक्स



  • नेटफ्लिक्सलाही यंदा आर्थिक फटका बसला आहे.  कंपनीनं दोन टप्प्यात कर्मचारी कमी केले


मेटा



  • फेसबुकची मूळ कंपनी मेटा कंपनी मोठी कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत


सिगेट टेक्नॉलॉजी



  • हार्ड ड्राईव्ह निर्मितीतल्या महत्वाच्या कंपनीतही तीन हजार कर्मचारी कपात


इंटेल



  • 18 हजार कोटींची बचत करण्यासाठी जवळपास 20 टक्के कपातीची शक्यता


मायक्रोसॉफ्ट



  • अपेक्षित उत्पन्न नसल्याने मायक्रोसॉफ्ट कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत


कॉइनबेस



  • अमेरिकेतील कॉइनबेस कंपनीने 18 टक्के कर्मचारी कमी केले


स्नॅप



  • ऑगस्टअखेर कंपनीने 20 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता


शॉपिफाय


ऑनलाईन शॉपिंग कंपनीशॉपिफायनंही 10 टक्के कर्मचारी कपात केली


स्ट्राईप


डिजिटल पेमेंट कंपनी स्ट्राईपनंही 14 टक्के कपातीची तयारी केली


ओपनडोअर


रिअल इस्टेटमधील स्टार्टअप कंपनी ओपनडोअरनंही 18 टक्के कर्मचाऱ्यांना काढलं


आता  हाच नोकरकपातीचा ट्रेण्ड जानेवारीतही सुरु राहिलाय. त्याची सुरुवात भारतातही झाली आहे.  केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मंदीची भीती व्यक्त केली आहे. तर काही दिवसांपूर्वी आयएमएफनंतही  अशाच मंदीची शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात नोकरकपात होईल, बेरोजगारी वाढेल.  त्याची पहिलीच झलक जानेवारीच्या पहिल्या 15  दिवसांमध्ये आली आहे