JSW Group: देशातील आघाडीची पोलाद उत्पादक कंपनी JSW समूहाने (JSW Group) इलेक्ट्रिक वाहन (EV) आणि EV बॅटरी उत्पादनात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ईव्ही सेक्टरमध्ये जेएसडब्ल्यू ग्रुपच्या प्रवेशामुळे मोठी खळबळ उडणार आहे. यासाठी कंपनी सुमारे 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळं सुमारे 11 हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. या प्लांटसाठी JSW ग्रुपने ओडिशा सरकारसोबत (Odisha Govt) सामंजस्य करारही केला आहे.
ईव्ही बॅटरी प्लांटची क्षमता 50 गिगावॉट असणार
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्लांट कटक आणि पारादीपमध्ये उभारला जाऊ शकतो. यामुळं हरित ऊर्जा क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. या प्रकल्पांतर्गत 50 गिगावॅट क्षमतेचा इलेक्ट्रिक वाहन बॅटरी प्लांट उभारण्यात येणार आहे. यासोबतच इलेक्ट्रिक वाहन, लिथियम रिफायनरी, कॉपर स्मेल्टर आणि पार्ट्स बनवण्याचे प्लांटही उभारले जाणार आहेत.
तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार : नवीन पटनायक
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक म्हणाले की, सरकार हरित ऊर्जा क्षेत्राबाबत खूप उत्सुक आहे. राज्यात नवीन संधी आणि शक्यतांना चालना दिली जात आहे. या प्लांटमुळं राज्यातील ईव्ही पायाभूत सुविधा अधिक बळकट होणार आहेत. याशिवाय तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. JSW समूहासोबतच्या या करारामुळं राज्यात उच्च कुशल नोकऱ्या निर्माण होतील. राज्याच्या औद्योगिकीकरणातही आमचा पाठिंबा मिळेल. आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले होतील आणि तरुणांना ईव्ही क्षेत्रातही प्रशिक्षित करता येईल.
सर्व भागधारकांना फायदा होईल : सज्जन जिंदाल
जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल (Sajjan Jindal) म्हणाले की, या ईव्ही आणि बॅटरी प्लांटमुळं ओडिशाशी आमचे संबंध अधिक दृढ होतील. याचा फायदा सर्व संबंधितांना होईल. याशिवाय नवे प्रयोग, रोजगार आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळेल. ईव्ही क्षेत्रात प्रवेश करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
JSW ही मुंबईतील एक भारतीय बहुराष्ट्रीय पोलाद उत्पादक कंपनी
JSW स्टील लिमिटेड ही मुंबईतील एक भारतीय बहुराष्ट्रीय पोलाद उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी JSW समूहाची प्रमुख कंपनी आहे भूषण पॉवर अँड स्टील , इस्पात स्टील आणि जिंदाल विजयनगर स्टील लिमिटेडच्या विलीनीकरणानंतर जेएसडब्ल्यू स्टील ही भारतातील दुसरी सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील स्टील कंपनी बनली आहे. सज्जन जिंदाल हे जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष आहेत.
महत्वाच्या बातम्या: