कोल्हापूर/ मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फटका राज्यातील जनआरोग्य योजनेला बसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण राज्यातील रुग्णालयांचे 889 कोटी रुपये सरकारकडून थकीत आहेत. गेल्या 8 महिन्यांपासून हे पैसे रुग्णालयांना देण्यात आले नाहीत...त्यामुळं जनआरोग्य योजनेतून उपचार घेणाऱ्या रुग्णांवर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी येत्या 2 ते 4 दिवसात  रुग्णालयांचे पैसे दिले जातील असं म्हटलं. एबीपी माझानं या बाबत बातमी प्रसिद्ध केली होती. 

Continues below advertisement


रुग्णालयांचे 889 कोटी थकले


जर सरकारकडून जनआरोग्य योजनेचे रुग्णालयांचे पैसे थकीत ठेवले तर त्याचा थेट परिणाम उपचारांवर होऊ शकतो. केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आणि राज्याच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनच्या माध्यमातून रुग्णांवर पाच लाखापर्यंतचा उपचार मोफत केला जातो. त्याचे पैसे सरकारकडून संबंधित रुग्णालयांना दिले जातात...मात्र गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील एकाही रुग्णालयाला या उपचाराचे पैसे सरकारनं दिले नाहीत. त्यामुळं याचा परिणाम रुग्णांच्या उपचारावर होतोय. कारण अनेक रुग्णालये ही थकीत रक्कम मिळणार की नाही या चिंतेत आहेत. त्यामुळं काही अंशी उपचार करताना देखील चालढकल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.


जनआरोग्यचे कोणत्या जिल्ह्यात किती थकीत?


अहमदनगर 55 कोटी, अकोला 19.37 कोटी, अमरावती 25.22 कोटी, बीड 10.46 कोटी, भंडारा 2 कोटी, बुलढाणा 12.82 कोटी, चंद्रपूर 3.65 कोटी,छत्रपती संभाजीनगर 77.26 कोटी, धाराशिव 4.18 कोटी, धुळे 25.18 कोटी, गडचिरोली 36 लाख, गोंदिया 3.82 कोटी, हिंगोली 1.21 कोटी, जळगाव 28.63 कोटी, जालना 17.13 कोटी, कोल्हापूर 53.29 कोटी, लातूर 13.46 कोटी,मुंबई आणि उपनगर 68. 29 कोटी, नागपूर 55.47 कोटी, नांदेड 21. 69 कोटी, नंदुरबार 2.87 कोटी, नाशिक 90.74 कोटी, पालघर 3.30 कोटी, परभणी 2.75 कोटी, पुणे 65.54 कोटी, रायगड 14.47 कोटी, रत्नागिरी 10.56 कोटी, सांगली 35.80 कोटी, सातारा 25.41 कोटी, सिंधुदुर्ग 3.02 कोटी, सोलापूर 42.50 कोटी, ठाणे 56. 62 कोटी, वर्धा 21.87 कोटी, वाशिम 7.78 कोटी, यवतमाळ 7.41 कोटी रुपये थकले आहेत.  राज्यभरातील सर्व रुग्णालयांचे मिळणू एकूण 889.97 कोटी रुपये थकले असल्याची माहिती आहे.


आरोग्यमंत्री काय म्हणाले?


आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुद्यावर पत्रकारांशी संवाद साधला. प्रकाश आबिटकर यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत काम थांबवण्याची रुग्णालयांना गरज नाही, असं म्हटलं.   रुग्णालयांच्या रखडलेल्या पैशाबाबत आमची उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या दालनात बैठक पार पडली आहे. काही तांत्रिक बाबी मुळे हे पैसे अडकले होते मात्र पुढील 2 ते 4 दिवसांत या रुग्णालयांचे पैसे दिले जातील, असं प्रकाश आबिटकर म्हणाले. 



इतर बातम्या :