ITC Demerger :  ITC लिमिटेडच्या संचालक मंडळाने (ITC Company Board) मोठा निर्णय घेतला आहे. ITC ने  हॉटेल व्यवसायाच्या डिमर्जरला मंजूरी दिली आहे. कंपनीने 24 जुलै रोजी प्राधिकरणाला दिलेल्या माहितीनुसार, आता आयटीसी आपल्या हॉटेल व्यवसायासाठी वेगळी कंपनी स्थापन करणार आहे. 


आयटीसी कंपनीने सांगितले की, आजच्या युगात हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री खूप वेगाने वाढत आहे आणि एक वेगळी उपकंपनी निर्माण करून हॉटेल व्यवसायावर अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. मुंबई शेअर बाजारावर आज, 24 जुलै रोजी कंपनीचे शेअर्स 3.89 टक्क्यांनी घसरून 471.35 रुपयांवर बंद झाले. तर, राष्ट्रीय शेअर बाजारावर  4.30 टक्क्यांच्या घसरणीसह 469.35 रुपयांवर स्थिरावला. 


संचालक मंडळाला मंजुरी दिलेल्या डिमर्जरच्या योजनेनुसार (हॉटेल व्यवसाय वेगळे करणे), नवीन संस्था थेट कंपनीच्या शेअरधारकांकडे 60 टक्के असेल. तर आयटीसी लिमिटेडकडे 40 टक्के हिस्सा असणार आहे.


हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात चांगली कामगिरी करणे हा कंपनीच्या या उपक्रमाचा उद्देश आहे. या अंतर्गत, नवीन घटकाला दीर्घकालीन स्थिरता तसेच इतर मदत दिली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. ITC चे चेअरमन संजीव पुरी म्हणाले, “हॉस्पिटॅलिटी-केंद्रित युनिटद्वारे, भारतीय हॉस्पिटॅलिटी उद्योगातील संधींचा अधिक चांगला फायदा होईल आणि वाढीला अधिक प्रोत्साहन मिळेल. प्रस्तावित पुनर्रचना अंतर्गत, ITC आणि नवीन संस्था दोघांना पूरक मदत होईल. 


ITC लिमिटेड गेल्या आठवड्यात 6 लाख कोटींहून अधिक बाजार भांडवल असलेली शेअर बाजारातील सातवी मोठी लिस्टेड भारतीय कंपनी ठरली. कंपनीने पहिल्यांदाच 6 लाख कोटींचा बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला होता. कंपनीचे शेअर्स यावर्षी 48 टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. सिगारेट, FMCG, पुठ्ठ्याचे (कार्ड बोर्ड) आणि हॉटेल्समध्ये आयटीसीने चांगली कामगिरी केली आहे. 


रिलायन्समधून  जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे डिमर्जर


रिलायन्स इंडस्ट्रीजमधून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी (Jio Financial Services-JFSL)वेगळी करण्यात आली आहे.  शेअर धारकांना रेकॉर्ड डेटपर्यंत रिलायन्सचे जेवढे शेअर्स होते, तेवढे शेअर्स जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे देण्यात आले आहेत. येत्या काही महिन्यात  जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. 


रिलायन्स इंडस्ट्रीजने (RIL) 15,500 कोटी रुपये रोख आणि तरल गुंतवणूक Jio Financial Services (JFSL) मध्ये हस्तांतरित केली आहे. या हस्तांतरणानंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीकडे 20,700 कोटी रुपयांची तरल संपत्ती आहे.


(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर खरेदी-विक्रीबाबतचा हा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. गुंतवणुकीआधी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)