Israel-Palestine Effect on India : डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच, शेकडो क्षेपणास्त्रांचा मारा, कानठळ्या बसवणारा आवाज, जिवाच्या आकांताने आक्रोश करणारी माणसं आणि छातीत धडकी भरावा असा आगीचा भडका. गेल्या दोन दिवसांपासून इस्रायल (Israel) मध्ये हा हलकल्लोळ माजला आहे. गगनचुंबी इमारती क्षणार्धात भुसपाट झाल्या आहेत. मात्र, इस्रायलमध्ये भडकलेल्या या युद्धाच्या आगडोंबाचे चटके भारतालाही बसू लागले आहेत.
इस्रायल-हमास युद्धाला भारतालाही फटका
इस्लायल-हमास युद्धाला अवघे तीन दिवस झाले असले तरी, याचा परिणाम भारतालाही भोगावा लागत आहे. त्यामुळे, पुढे आणखी काही दिवस हे युद्ध चाललं, तर भारताला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. इस्रायल आणि हमास यांच्यातील भीषण युद्धाला सुरुवात झाल्याने अवघ्या जगाची झोप उडाली आहे. इस्राईल आणि पॅलेस्टाईनमधील वाद जगाला नवा नाही, पण शनिवारी या वादाने आणखी एक युद्ध पेटलं आणि जगभरातल्या बाजारपेठा सुन्न झाल्या. युक्रेन युद्धाने केलेल्या परिणामांतून जग अजूनही सावरलेलं नाही. त्यातच आता या नव्या युद्धाने भारतलाही हादरा बसला आहे.
युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर कडाडले
युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 130 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या होत्या. मात्र, त्या पुन्हा एकदा खाली येताना पाहायला मिळत होत्या. मात्र, जागतिक मंदी आणि आता इस्त्रायल-हमास यांच्यात युद्ध सुरु झाल्याने पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे भाव 88 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत.
पाहा Special Report : युद्ध इस्रायलला, झळ भारताला; प्रकरण काय?
सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता
युद्धामुळे तेलाच्या किंमतीवर परिणाम थेट आणि लगेच झाला आहे. पण भारतासाठी ही फक्त एकच चिंतेची बाब नाही. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे भाव 85 डॉलर प्रति बॅरल पार गेल्याने भारताची करंट अकाऊंट तुट आणखी वाढू शकते. आधीच तेल कंपन्या नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, आता ते नुकसान वाढण्याचा अंदाज आहे. सोन्याचे भाव कमी होण्याचे संकेत मिळत होते. मात्र, ते पुन्हा एकदा सोन्याचे दर 60 हजार रुपये तोळ्यावर गेले आहेत. युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर देखील झाला आहे. सोमवारी शेअर बाजर गडगडल्याचं पाहायला मिळालं.
भारतातील आयटी कंपन्यांनाही फटका बसण्याची शक्यता
अदानी समुहातील अदानी पोर्टकडून उत्तरी इस्त्रायलच्या हायफा पोर्टमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. सोबतच, अनेक भारतीय आयटी कंपन्यांकडून इस्त्रायलमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे युद्ध आणखी काहीकाळ सुरु राहिल्यास भारतीय कंपन्यांना देखील त्याचे हादरे बसताना पाहायला मिळणार आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :