IPO latest News : शेअर बाजारात  (Share Market) सध्या तेजी असल्याचे दिसून येत आहे. सेन्सेक्सने (Sensex) 71 हजार आणि निफ्टीने (Nifty) 21 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर, दुसरीकडे शेअर बाजारात सध्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या आयपीओला (IPO) मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आता 18 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या आठवड्यात तब्बल 11 कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल होत आहेत. त्यातील 7 कंपन्यांच्या आयपीओंचा आकार 3910 कोटी रुपये इतका असणार आहे. त्याशिवाय, चार एसएमई कंपन्यांचेही बाजारात आयपीओ येणार आहेत. त्यांचा आकार हा 135 कोटींच्या घरात आहे. 


सेबीकडे 65 कंपन्यांच्या आयपीओचा प्रस्ताव


या सर्व आयपीओंना बाजारातून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आयपीओद्वारे पैसे उभारण्याची प्रक्रिया पुढील वर्षीही सुरू राहणार आहे. सेबीकडे सुमारे 65 IPO प्रस्ताव आले आहेत. यापैकी 25 कंपन्यांना बाजार नियामक सेबीकडून मंजुरीही मिळाली आहे. आयपीओमध्ये होत असलेला नफा आणि कंपन्यांकडून वाजवी किंमत ठेवल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्याबाबत चांगलाच उत्साह आहे.


मेनबोर्डचे 7 आणि 4 एसएमई कंपनीचे आयपीओ


मेनबोर्ड आयपीओमध्ये मुथूट मायक्रोफिन, मोटीसन्स ज्वेलर्स, सूरज इस्टेट ज्वेलर्स, हॅपी फोर्जिंग्स, आरबीझेड ज्वेलर्स, क्रेडो ब्रँड्स आणि आझाद इंजिनिअरिंग या कंपन्यांचे पुढील आठवड्यात आयपीओ येणार आहेत. तर, दुसरीकडे एसएमई सेगमेंटमध्ये सहारा मेरिटाइम, इलेक्ट्रो फोर्स, शांती स्पिन्टेक्स आणि ट्रायडेंट टेकलॅब बाजारात येणार आहेत.


ग्रे मार्केटमध्ये मोतीसन्स ज्वेलर्सचा शेअर दर सुस्साट


मुथूट मायक्रोफिनचा आयपीओ 18 ते 20 डिसेंबर दरम्यान खुला असेल. कंपनीचा IPO 960 कोटी रुपयांचा असेल. कंपनीने इश्यूसाठी रु. 277 ते रु 291 चा प्राइस बँड निश्चित केला आहे. गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या महसुलात 72 टक्के वाढ झाली असून नफा 205 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.  सूरज इस्टेट डेव्हलपर्स कंपनीचा 400 कोटी रुपयांचा IPO 18 ते 20 डिसेंबर असणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला 32.06 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्याच तारखेला Motisons Jewellers देखील त्याचा IPO लॉन्च करणार आहे. या आयपीओबाबत ग्रे मार्केटमध्ये कमालीचा उत्साह आहे. त्याची इश्यू किंमत 55 रुपये आहे. तथापि, ग्रे मार्केटमध्ये त्याचा प्रीमियम 100 रुपये चालू आहे.


सर्व कंपन्या आहेत फायद्यात


हॅपी फोर्जिंग्सचा आयपीओ 19 डिसेंबरला उघडणार आहे. याद्वारे कंपनीला बाजारातून 1009 कोटी रुपये उभे करायचे आहेत. कंपनीला पहिल्या सहामाहीत 116 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. आरबीझेड ज्वेलर्सचा 100 कोटी रुपयांचा आयपीओही 19 ते 21 डिसेंबर दरम्यान खुला होणार आहे. क्रेडो ब्रँड्स प्रथमच आपला IPO लाँच करत आहे. 550 कोटी रुपयांचा हा IPO देखील 19 डिसेंबरलाच उघडणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 8.5 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. आझाद इंजिनिअरिंगचा आयपीओ 20 डिसेंबरला खुला होणार आहे. ही कंपनीही नफ्यात सुरू आहे.


या एसएमई कंपन्यांच्या आयपीओवर नजर


सहारा मेरिटाइमचा 7 कोटी रुपयांचा IPO 18 डिसेंबर रोजी बाजारात येणार आहे. इलेक्ट्रो आणि शांती 19 डिसेंबर रोजी त्यांचा IPO लॉन्च करणार आहेत. ट्रायडंटचा IPO 21 डिसेंबरला येणार आहे. या सर्व SME IPO बाबत बाजारात उत्सुकता आहे.