Paytm Share Crashes: पेटीएमच्या शेअरमध्ये घसरण सुरूच आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमच्या शेअरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी सकाळी पेटीएमचा शेअर 8 टक्क्यांहून अधिक घसरला असून आता याची किंमत 616 रुपये झाली आहे. सोमवारी पेटीएमचा शेअर 13 टक्क्यांनी घसरला होता. पेटीएमच्या शेअरचे बाजार भांडवल 50,000 कोटी रुपयांवर घसरून 40,000 कोटींवर आले आहे. सध्या पेटीएम 6.42 टक्क्यांच्या घसरणीसह 631 रुपयांवर ट्रेड करत आहे.
स्पष्टीकरणानंतरही शेअरमध्ये घसरण सुरूच
चिनी कंपन्यांचा डेटा लीक केल्यामुळे नवीन ग्राहकांचा समावेश करण्यास आरबीआयने बंदीच्या वृत्ताचे पेटीएम पेमेंट्स बँकेने खंडन केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, कंपनी रिझर्व्ह बँकेच्या स्थानिक पातळीवरील डेटा स्टोरेज नियमांचे पूर्णपणे पालन करत आहे आणि त्याचा सर्व डेटा देशात उपलब्ध आहे. मात्र कंपनीच्या स्पष्टीकरणानंतरही पेटीएमच्या शेअरमध्ये घसरण सुरूच आहे.
आरबीआयच्या कारवाईनंतर घसरले शेअर्स
शुक्रवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध लागू केले. पेटीएम पेमेंट्स बँकेत नवीन ग्राहकांचा समावेश करण्यास रिझर्व्ह बँकेने मनाई केली. त्याच्या परिणामी सोमवारी पेटीएमचा शेअर कोसळला असल्याचे म्हटले जात आहे. आरबीआयने आदेश दिले आहेत की, पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने आयटी लेखा परीक्षण केल्यानंतर आरबीआयच्या परवानगीनंतर नवीन ग्राहकांचा समावेश करावा असे आदेश आरबीआयने दिले आहेत.
शेअर्समध्ये आणखी किती होऊ शकते घसरण
शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी विक्री होत आहे. पेटीएमचे शेअर्स सूचीबद्ध झाल्यापासून या दोन दिवसात, याचे मूल्यांकन 71 टक्क्यांहून अधिक घसरले आहे. मंगळवारी हा शेअर 616 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. पेटीएमने 2150 रुपये प्रति शेअर दराने आपला IPO जारी केला होता. आयपीओच्या किमतीमुळे गुंतवणूकदारांचे प्रति शेअर 1500 रुपयांपेक्षा जास्त नुकसान होत आहे.
संबंधित बातमी:
PayTm Share : पेटीएमला मोठा झटका; शेअर्सची किंमत 12 टक्क्यांनी घसरली, गुंतवणूकदार होरपळले