LIC IPO Updates : देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेल्या एलआयसी आयपीओसाठी देशातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एलआयसीचा आयपीओ चांगल्या दरावर लिस्ट होईल अशी अपेक्षा अनेकांना आहे. तर, दुसरीकडे ग्रे मार्केटमध्ये एलआयसी आयपीओचा प्रीमियम दर आणखीच घसरला आहे. हा प्रीमियम दर आता नकारात्मक झाला असून आयपीओसाठी बोली लावणाऱ्या गुंतवणुकदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 


ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम दरात घट का?


एलआयसीच्या आयपीओला देशातील गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. एलआयसी कर्मचारी, पॉलिसीधारक आणि किरकोळ गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, त्याच वेळेस परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी राखीव असलेल्या कोट्यात फार कमी प्रमाणात आयपीओ सब्सक्राइम झाला. रशिया-युक्रेन युद्ध, वाढती महागाई, भारतीय शेअर बाजारात सुरू असलेली विक्री यामुळे परदेशी गुंतवणुकदारांनी पाठ फिरवली असल्याचे म्हटले जात आहे. 


एलआयसी आयपीओ खुला होण्याआधी ग्रे मार्केटमध्ये 95 रुपयांचा प्रीमियम दर झाला होता. एलआयसी आयपीओ खुला झाल्यानंतर प्रीमियम दरात चढ-उतार सुरू होते. आयपीओ बंद होण्याच्या अखेरच्या दिवशी ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम दर हा 40 रुपयांच्या घरात गेला होता. आता मात्र, ग्रे मार्केटमध्ये एलआयसीचा आयपीओ प्रीमियम हा इश्यू प्राइसच्या कमाल दरापेक्षा 15 रुपयांपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे शेअर बाजारात एलआयसी लिस्ट होताना सवलतीच्या दरात लिस्ट होण्याची शक्यता आहे. 


एलआयसी आयपीओच्या माध्यमातून सरकार आपला 3.5 टक्के हिस्सा विक्री करून 21 हजार कोटी रुपये उभारत आहे. कंपनीने यासाठी 902 ते 949 रुपये प्रति शेअर दर इतकी किंमत निश्चित केली आहे. अँकर गुंतवणुकदारांकडून एलआयसीने जवळपास 5627 कोटी रुपये जमवले आहेत. 


12 मे रोजी होणार शेअर्सचे वाटप 


आयपीओसाठी बोली लावलेल्या गुंतवणुकदारांना 12 मे रोजी शेअर्सचे वाटप करणार आहे. ज्यांनी आयपीओसाठी बोली लावली. मात्र, शेअर्स मिळाले नाहीत अशा गुंतवणुकदारांचे पैसे काही दिवसात त्यांच्या खात्यात परत येतील. एलआयसी शेअरचे वाटप 12 मे रोजी झाल्यानंतर 17 मे रोजी बाजारात लिस्टिंग होणार आहे. आयपीओद्वारे शेअर्स हे सोडतीच्या माध्यमातून गुंतवणुकदारांना मिळतात.