LIC IPO Allotment Date: अनेकांनी गुंतवणुकीत चांगल्या परताव्या अपेक्षेसह एलआयसीच्या आयपीओसाठी बोली लावली आहे. आयपीओसाठी बोली लावल्यानंतर आता अनेकांना शेअर्स कधी मिळणार याची प्रतिक्षा लागली आहे. एलआयसीकडून गुरुवारी म्हणजे 12 मे रोजी गुंतवणुकदारांना शेअर्स वाटप करणार आहे. तर, शेअर बाजारात एलआयसी कंपनी 17 मे रोजी लिस्ट होणार आहे. 


भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या ( LIC IPO)आयपीओसाठी बोली लावण्याचा सोमवारी अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी पॉलिसधारकांसाठी असलेल्या आरक्षित कोट्यासाठी सर्वाधिक सब्सक्रिप्शन मिळाले आहेत. तर, कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कोट्यातूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. किरकोळ गुंतवणुकदारांनीदेखील भरभरून प्रतिसाद दिला. 


12 मे रोजी होणार शेअर्सचे वाटप 


आयपीओसाठी बोली लावलेल्या गुंतवणुकदारांना 12 मे रोजी शेअर्सचे वाटप करणार आहे. ज्यांनी आयपीओसाठी बोली लावली. मात्र, शेअर्स मिळाले नाहीत अशा गुंतवणुकदारांचे पैसे काही दिवसात त्यांच्या खात्यात परत येतील. एलआयसी शेअरचे वाटप 12 मे रोजी झाल्यानंतर 17 मे रोजी बाजारात लिस्टिंग होणार आहे. आयपीओद्वारे शेअर्स हे सोडतीच्या माध्यमातून गुंतवणुकदारांना मिळतात. 


शेअर्स मिळाले की नाही? असे पाहा


तुम्हाला आयपीओतून शेअर्स मिळाले की नाही हेदेखील पाहता येणार आहे. मुंबई शेअर बाजाराचे अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध होऊ शकेल. 


- तुम्ही पहिल्यांदा  www.bseindia.com या संकेतस्थळावर लॉगिन करा
- तुम्ही  ‘equity’ या पर्यायावर क्लिक करा 
- हा पर्याय निवडल्यानंतर ड्रॉपडाउनमध्ये ‘LIC IPO’ पर्याय निवडा
- आता नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक नमूद करावा लागेल
- त्याशिवाय तुमचा पॅन क्रमांक भरावा लागेल 
- त्यानंतर 'I am not a robot' हा पर्याय निवडून व्हेरिफाय करा आणि सर्च बटणावर क्लिक करा
- त्यानंतर तुम्हाला  LIC IPO चे शेअर अलॉटमेंट दिसतील 


आयपीओला चांगला प्रतिसाद 


पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांच्या कोट्यातून आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पॉलिसीधारकांच्या कोट्यातून जवळपास 6 पटीने सब्सक्रिप्शन मिळाले आहे. तर, कर्मचाऱ्यांच्या कोट्यातून आयपीओ जवळपास 4.32 पटीने सब्सक्राइब झाला आहे. संस्थात्मक गुंतवणुकदारांच्या (QIB) कोट्यात 2.83 पटीने सब्सक्राइब झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.