LIC IPO Updates : जर तुम्ही LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असेल, तर उद्या शेवटचा दिवस आहे. या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी गमावू नका. LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक गुंतवणूकदार शेअर बाजार बंद झाल्यानंतरही रविवारी त्यांच्या बोली सादर करू शकतात. LIC IPO उद्या म्हणजेच, 9 मे रोजी बंद होणार आहे. हे पहिल्यांदाच घडत आहे की, रविवारी देखील IPO साठी बोली खुली आहे. 


...म्हणून रविवारीही खुल्या राहणार 'या' बँका


अलीकडेच, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या ताज्या अधिसूचनेतून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आधी LIC IPO फक्त शनिवारी खुला राहणार होता. पण त्यानंतर सरकारनं सर्व बँकांना रविवारीही एलआयसी आयपीओसाठी आलेले सर्व अॅप्लिकेशन प्रोसेस करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी बँकांना ASBA अर्जांवर प्रक्रिया करणाऱ्या सर्व शाखा रविवारी म्हणजेच, 8 मे रोजी खुल्या ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.


'या' लोकांसाठी आरक्षण आणि सवलत


LIC IPO मध्ये, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच, 15.8 लाख शेअर्स एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत आणि 2.21 कोटी शेअर्स पॉलिसीधारकांसाठी राखीव आहेत. 9.88 कोटी पेक्षा जास्त शेअर्स क्वॉलिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIBs) साठी आणि 2.96 कोटी पेक्षा जास्त शेअर्स गैर-संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव आहेत. किरकोळ गुंतवणूकदार आणि एलआयसी कर्मचार्‍यांना प्रति शेअर 45 रुपये सवलत दिली जाणार आहे. तर एलआयसी पॉलिसीधारकांना प्रति शेअर 60 रुपये सूट मिळणार आहे. 


पॉलिसीधारकांकडून उत्तम प्रतिसाद


एलआयसी आयपीओला (LIC IPO) सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. किरकोळ गुंतवणूकदार वर्गानं आतापर्यंत 148 टक्के बोली प्राप्त केल्या आहेत. पॉलिसीधारकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे आणि या विभागाला आतापर्यंत 4.74 पट अधिक सबस्क्रिप्शन मिळालं आहे. तर कर्मचार्‍यांचा हिस्सा 3.60 पट वर्गणीदार झाला आहे. त्याचप्रमाणे, QIB साठी राखून ठेवलेला शेअर 67 टक्के आणि NII शेअर 1.15 पटीनं सबस्क्राइब झाला आहे. एकूण, LIC IPO साठी आतापर्यंत 1.69 पट अधिक बोली प्राप्त झाल्या आहेत.