Adani Wilmar IPO: अदानी समूहातील सातवी कंपनी आता शेअर बाजारात प्रवेश करणार आहे. अदानी समूहाची विल्मर कंपनीच्या आयपीओसाठी आजपासून अर्ज करता येणार आहे. अदानी विल्मर कंपनीकडून 3600 कोटींच्या समभागाची विक्री करण्यात येणार आहे.
अदानी विल्मर लिमिटेड (AWL) कंपनी ही अदानी समूह आणि सिंगापूरमधील विल्मर समूहाची संयुक्त कंपनी आहे. फॉर्च्युन ब्रँडअंतर्गत खाद्य तेल आणि इतर खाद्य उत्पादनांची विक्री करण्यात येते. यामध्ये तांदूळ, सोयाबिन, दाल, बेसन, पीठ, साखर आदींचा समावेश आहे. भारतीय बाजारपेठेत फॉर्च्युन ब्रँडचा चांगला वाटा आहे. तर, सिंगापूरमधील विल्मर कंपनी ही कृषी व्यवसायाशी निगडीत आहे.
शेअर प्राइस बॅण्ड किती?
अदानी विल्मर कंपनीच्या आयपीओत प्रती शेअर 218-230 रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. आयपीओद्वारे गुंतवणुकदारांना 65 इक्विटी शेअर्सच्या लॉटसाठी अर्ज करता येणार आहे. एक गुंतवणुकदार अधिकाधिक 13 लॉटसाठी अर्ज करू शकतो.
आयपीओसाठी अर्ज करण्याची मुदत?
अदानी विल्मरसाठी 27 जानेवारीपासून अर्ज करता येणार आहे. गुंतवणुकदारांना 31 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्थसंकल्पानंतर अदानी विल्मर शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे.
ग्रे मार्केटमध्ये काय चर्चा?
ग्रे मार्केटमध्ये अदानी विल्मरच्या प्रीमियम किंमतीत 50 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा हा परिणाम झाला आहे. सध्या ग्रे मार्केटमध्ये प्रती शेअर 40 ते 50 रुपये प्रीमियम दर मिळत आहे.
किती निधी जमवणार?
आयपीओतून अदानी विल्मर 3600 कोटींचे भागभांडवल उभारणार आहे. यातील 1900 कोटी रुपये भांडवली खर्चासाठी, 1100 कोटी रुपये कर्जाची परतफेड आणि 500 कोटी रुपये गुंतवणूक आणि धोरणात्मक बाबींसाठी वापरले जाणार आहे.
शेअर बाजारात अदानी समूहाची सातवी कंपनी
शेअर बाजारात अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी एंटरप्राइझेस, अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट आणि अदानी पाॅवर या सहा कंपन्या सूचीबद्ध आहेत. यातील काही कंपन्यांनी गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला होता.