India Unemployment Rate: भारतील राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे समोर आल्यानंतर चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतात बेरोजगारीचा दर (Unemployment Rate) वाढला असून मागील तीन महिन्यातील हा सर्वाधिक बेरोजगारी दर आहे. नोव्हेंबर महिन्यात भारतातील बेरोजगारीचा दर आठ टक्के इतका नोंदवण्यात आले असल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने म्हटले आहे. 


नोव्हेंबरमध्ये शहरी भागातील बेरोजगारीचा दर मागील महिन्यातील 7.21 टक्क्यांवरून 8.96 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तर ग्रामीण बेरोजगारीचा दर हा 8.04 टक्क्यांवरून 7.55 टक्क्यांवर घसरला असल्याचे CMIE च्या डेटामधून दिसून आले. 


सरकारकडून बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली जात नाही. तर, CMIE चा डेटा हा अर्थतज्ज्ञ, धोरण तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत तयार केला जातो. 


ऑक्टोबर महिन्यात 7.8 टक्के बेरोजगारी दर


ग्रामीण भागातील रोजगार घटल्याने ऑक्टोबर महिन्यात बेरोजगारी दर 7.77 टक्के इतका नोंदवण्यात आला होता. ग्रामीण भागातील बेरोजगारी दर हा सप्टेंबर महिन्यात 5.84 टक्के इतका होता. ऑक्टोबर महिन्यात हा दर वाढून 8.04 टक्के इतका झाला. ऑक्टोबर महिन्यात शहरी भागातील बेरोजगारीचा दर कमी झाला होता. शहरी भागात बेरोजगारीचा दर ऑक्टोबर महिन्यात 7.21 टक्के होता. तर, सप्टेंबर महिन्यात हा दर 7.7 टक्के इतका होता. 


भारतीय अर्थव्यवस्थेची गती मंदावली


भारतीय अर्थव्यवस्थेची गती दुसऱ्या तिमाहीत मंदावली असल्याचे समोर आले आहे. बुधवारी जीडीपी आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. जुलै-सप्टेंबर या दुसऱ्या तिमाही दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्थेचा दर 6.3 टक्के इतका होता. वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून महिन्याच्या दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेने 13.5 टक्के दराने विकास केला होता. 


भारताचा जीडीपी दर 7 टक्के राहणार: मुख्य आर्थिक सल्लागार


मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर हा सध्याच्या आर्थिक वर्षात 6.8 टक्के ते 7 टक्क्यांपर्यंत पोहचेल. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येत असून जीडीपीचा दर वर्ष 2019-20 च्या सरासरी पातळीवर पोहचला असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक संकट असतानाही सण-उत्सवाच्या काळात झालेली विक्री, पीएमआय, कर्जांची वाढती मागणी आणि वाढलेली वाहन खरेदी याचा फायदा अर्थव्यवस्थेला मिळाला असल्याचे मुख्य आर्थिक सल्लागारांनी सांगितले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: