नवी दिल्ली : जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु असून येत्या जुलै महिन्यांपासून काही नियम बदल होणार आहेत. रेल्वेच्या तिकीट आरक्षणासंदर्भातील काही गोष्टी बदलणार आहेत. भारतीय रेल्वेनं 500 किलोमीटर अंतरापेक्षा अधिकच्या प्रवासासाठी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय तात्काळ तिकीट बुकिंग संदर्भातील नियम बदलले जाणार आहेत. या बदलांचा परिणाम रेल्वे प्रवाशांवर होणार आहेत. जुलै महिन्यापासून रेल्वे प्रवासी भाडेवाढ, आयआरसीटीसी वेबसाईटवरील तात्काळ तिकीट बुकिंग नियमातील बदल लागू होणार आहेत. त्यासंदर्भातील असणं आवश्यक आहे.
रेल्वे प्रवास महागणार
भारतीय रेल्वे 1 जुलैपासून रेल्वे प्रवासभाड्यात वाढ करणार आहे. ही दरवाढ नाममात्र असेल. करोना संसर्गानंतर रेल्वे पहिल्यांदा भाडेवाढ करत आहे. लांब पल्ल्याचा प्रवास रेल्वेनं करणाऱ्यांसाठी ही भाडेवाढ लागू असेल. रेल्वेकडून करण्यात येत असलेली भाडेवाढ नॉन एसी मेल आणि एक्सप्रेस ट्रेनसाठी लागू असेल. प्रति किलोमीटर 1 पैसे भाडेवाढ असेल. तर, एसी क्लाससाठी 2 पैसे प्रति किलोमीटर वाढ लागू केली जाईल. पहिल्या 500 किलोमीटरच्या अंतरामधील सेकंड क्लास ट्रेन तिकीट आणि मासिक सीझन तिकीटात बदल केलेला नसेल. मात्र, 500 किलोमीटरच्या पुढील अंतरासाठी 0.50 पैसे प्रति किलोमीटर भाडेवाढ लागू होईल.
रेल्वे जुलै महिन्यापासून दुसरा बदल करणार आहे तो तात्काळ तिकीट बुकिंगशी संबंधित आहे. 1 जुलैपासून आधार पडताळणी झालेल्या खात्यामधून तात्काळ तिकीट बुक करता येईल. रेल्वे मंत्रालयानं यासंदर्भातील बदलांची घोषणा केली आहे. तात्काळ तिकिटं सर्वसामान्य आणि गरजू प्रवाशांना मिळावं यासाठी रेल्वे मंत्रालयानं हे बदल केले आहेत.
भारतीय रेल्वेनं अधिकृत तिकीट बुकिंग करणाऱ्या एजंटांवर देखील काही निर्बंध घालण्यात आले आहे.एजंट बुकिंग आता तात्काळ बुकिंग सुरु झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात करता येणार नाही. वेळेचा विचार केला असता सकाळी 10.00 ते 10.30 दरम्यान एसी तिकीट बुकिंग करता येतं तर, 11 ते 11.30 वाजता नॉन एसी तात्काळ तिकीटं बुक करता येतात. या पहिल्या अर्ध्या तासाच्या काळात तात्काळ तिकीट बुकिंग एजंटांना करता येणार नाही.
आधार ओटीपी प्रमाणीकरण
जुलै महिन्यापासून लागू होणारा तिरा नियम तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रिया मजबूत करण्यासाठी लागू केला जाईल. 1 जुलै 2025पासून आधार पडताळणी असलेले यूजर्सचं आयआरसीटीसी वेबसाईट आणि अॅपवरुन तात्काळ तिकीट बुक करु शकतात. 15 जुलैपासून आधार ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. तात्काल तिकीट बुकिंगमध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत.