नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) नं दहावीच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सीबीएसईच्या नव्या निर्णयानुसार एका वर्षात सीबीएसईकडून दोनवेळा परीक्षा घेतली जाणार आहे. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितलं की सीबीएसईनं दोन वेळा परीक्षा आयोजित करण्याच्या मॉडेलला मंजुरी दिली आहे. पहिली परीक्षा फेब्रुवारी आणि दुसरी परीक्षा मे महिन्यात आयोजित केली जाणार आहे.  

Continues below advertisement

दहावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यातील पहिली परीक्षा देणं अनिवार्य करण्यात आलं आहे. दुसऱ्या परीक्षेतील सहभाग ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. पहिल्या परीक्षेत ज्यांना गुण कमी मिळालेत ते दुसरी परीक्षा देऊन गुण वाढवू शकतात. मात्र, नव्या नियमांनुसार अंतर्गत मूल्यमान वर्षातून एकदा आयोजित केली जाणार आहे.  

सीबीएसईनं तयार केलेल्या ड्राफ्ट नुसार सीबीएसईकडून दहावीची पहिली परीक्षा फेब्रुवारी महिन्यात आयोजित केली जाईल. ही परीक्षा 17 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान आयोजित केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 5 ते 20 मे मध्ये आयोजित केली जाणार आहे. 

Continues below advertisement

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांसाठी अभ्यासक्रम एकच असेल. दोन्ही परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमांवर आधारलेली असेल. दोन्ही परीक्षांसाठी परीक्षा केंद्र देखील एकच असेल.

परीक्षा अर्ज दाखल करतानाच दोन्ही परीक्षांचं शुल्क जमा करावं लागेल. पहिल्या परीक्षेतील गुणांवर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी म्हणून दुसऱ्यांदा परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे. 

विद्यार्थ्यांना गुण वाढवण्याची संधी 

एखाद्या विद्यार्थ्यानं दोन्ही परीक्षा दिल्या तर कोणते गुण ग्राह्य धरणार असा प्रश्न पडू शकतो. सीबीएसईच्या नियमानुसार दोन्ही पैकी ज्या परीक्षेत गुण जास्त असतील ते गुण ग्राह्य धरले जातील. पहिल्या परिक्षेत चांगले गुण मिळाले आणि त्या तुलनेत दुसऱ्या परीक्षेत गुण कमी मिळाले तर पहिल्या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातील. 

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ या निर्णयाद्वारे विद्यार्थ्यांना दोन परीक्षा देण्याची संधी देत गुण वाढवण्याचा पर्याय उपलब्ध करुन देणार आहे. काही अडचणींमुळं दोन्ही पैकी एका परीक्षेत कमी गुण मिळाल्यास ज्या परीक्षेत गुण अधिक असतील त्यामधील गुण ग्राह्य धरले जातील. सीबीएसईच्या या निर्णयाचं विद्यार्थी आणि पालक वर्गातून कसं स्वागत केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या देशभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून सीबीएसई बोर्डातून शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI