Indian Railway IRCTC :  देशात दर महिन्याला कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून होतो. रेल्वेने प्रवाशांसाठी आणखी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. येत्या काही दिवसात चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे. या नऊ दिवसात भाविक देवीची पूजा करतात, उपवास ठेवतात. उपवासाच्या वेळी एखाद्याला रेल्वेने प्रवास करावा लागला, तर त्याला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.


प्रवाशांची ही अडचण दूर करण्यासाठी रेल्वेने निर्णय घेतला आहे. उपवास असलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये बसून त्यांच्या आवडीचे जेवण ऑर्डर करता येणार आहे. IRCTC 2 एप्रिलपासून ही विशेष सुविधा सुरू करणार आहे. या खास जेवणामध्ये कांदा आणि लसूण नसणार.  हे जेवण पूर्णपणे सात्विक आणि शुद्ध असेल. या जेवणात सामान्य मिठाऐवजी सैंदव मीठाचा वापर केला जाईल. हे खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यासाठी प्रवाशांना ई-केटरिंग किंवा 1323 क्रमांकावर कॉल करून जेवणासाठी आगाऊ नोंदणी करावी लागणार. 


या पदार्थांचा असणार समावेश


लस्सी, फळांचा ताजा रस, भाजी पुरी, भजी, फळं, चहा, दुग्दजन्य पदार्थ (रबडी, लस्सी), सुक्या मेव्याची खीर आदी पदार्थ असणार आहेत. 


उपवासाच्या थाळीसाठी किती पैसे मोजावे लागतील?


लोकांच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. IRCTC सुरू करणार असलेल्या  या उपवासाच्या थाळीची किंमत 125 रुपयांपासून ते 200 रुपये असणार आहे. एकूण ५०० गाड्यांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. ज्या ट्रेनमध्ये IRCTC कडून जेवणाची व्यवस्था केली जात आहे, त्या ट्रेनमध्येही जेवणाची व्यवस्था असणार आहे. ही सुविधा फक्त रेल्वे प्रवाशांसाठी असणार आहे. रेल्वे स्थानकावरील स्टॉलवर उपवासाच्या थाळी मिळणार नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha