Indian Spending Survey : गेल्या काही वर्षांत भारतीयांच्या खर्च करण्याच्या पद्धतीत मोठे बदल दिसून आले आहेत. विशेष म्हणजे हा बदल शहरी आणि ग्रामीण भागात (Rural Areas) झाला आहे. सांख्यिकी मंत्रालयानं (Ministry of Statistics) दिलेल्या माहितीनुसार, देशातील कुटुंबांचा सर्वाधिक खर्च हा अन्नपदार्थावर होत असल्याची माहिती दिली आहे. मिळालेल्या उत्पन्नाचा मोठा भाग भारतीय कुटुंब ही अन्नपदार्थावर खर्च करत असल्याचे अहवालातून समोर आलं आहे. 100 रुपयांपैकी 40 रुपये खाण्यावर खर्च होत आहे. 


घरगुती खर्चाबाबतचा आपला ताजा अहवाल सांख्यिकी मंत्रालयानं प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून असे समोर आले आहे की, आजही भारतीय कुटुंबे आपल्या उत्पन्नाचा सर्वात मोठा हिस्सा अन्नपदार्थांवर खर्च करतात. मात्र, गेल्या 20 वर्षांत खाण्या-पिण्यावरील खर्चात घट झाल्याचेही या आकडेवारीवरुन समोर आलं आहे. यासोबतच भारतीय आता लक्झरी वस्तू, कपडे आणि मनोरंजनावर खूप खर्च करत आहेत.


ग्रामीण भागातील कुटुंबाचा 100 रुपयांपैकी 47 रुपये खाण्यापिण्यावर खर्च


एनएसएसओने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शहरी भागात राहणारे एक भारतीय कुटुंब जेवणासाठी कमावलेल्या 100 रुपयांपैकी केवळ 39.7 रुपये खर्च करते. तर ग्रामीण भागात राहणारे कुटुंब 100 रुपयांपैकी 47 रुपये खाण्यापिण्यावर खर्च करते. या सर्वेक्षणातून असेही समोर आले आहे की, गेल्या काही वर्षांत भारतीयांनी धान्यावरील खर्च कमी केला आहे तर दूध आणि पॅकेज्ड फूडवर जास्त खर्च केला आहे. या सर्वेक्षणात आढळून आलेली विशेष बाब म्हणजे भारतीय लोक त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा खाद्यपदार्थांवर खर्च करत असले तरी गेल्या 20 वर्षांत या खर्चात घट झाली आहे.


या वस्तूवरील खर्चात मोठी वाढ 


दूध आणि पॅकेज्ड फूडवरील खर्चात वाढ झाली आहे. दूध आणि पॅकेज्ड फूडवरील खर्चात 4.2 टक्के वाढ झाली आहे. त्याचवेळी धान्यावरील खर्चात 7.9 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे 1999-2000 ते 2022-23 पर्यंत अन्नावरील खर्च 48.1 टक्क्यांवरून 39.7 टक्क्यांवर आला आहे. एनएसएसओच्या आकडेवारीनुसार, भारतीय त्यांच्या उत्पन्नातील 6.5 टक्के रक्कम मनोरंजनावर खर्च करत आहेत. विशेष म्हणजे भारतीय कुटुंब भाड्यावर सरासरी 6.5 टक्के खर्च करत आहेत. भारतीय कुटुंबे त्यांच्या उत्पन्नाच्या 5.4 टक्के कपड्यांवर खर्च करतात. कुटुंबाच्या उत्पन्नाच्या 5.9 टक्के रक्कम वैद्यकीय खर्चावर खर्च होत आहे. सरासरी भारतीय कुटुंब वाहतुकीवर 8.5 टक्के खर्च करते. त्याच वेळी भारतीय कुटुंबे त्यांच्या उत्पन्नाच्या 5.7 टक्के शिक्षणावर खर्च करत आहेत. गेल्या काही वर्षांत भारतीयांनी अन्नावरील खर्च कमी केल्याचे एनएसएसओच्या सर्वेक्षणातून स्पष्टपणे दिसून आले आहे. यासोबतच मनोरंजन, कपडे, वैद्यकीय खर्च आदींमध्येही वाढ झाली आहे. देशात पॅकेज्ड फूडची मागणीही वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.


महत्वाच्या बातम्या:


तरुणांनी पैशांची गुंतवणूक कुठं करावी? 'या' 4 गोष्टी फॉलो करा, जीवन आनंदात घालवा