Special FD Scheme : जर तुम्हाला मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. देशातील दोन मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका गुंतवणुकीवर चांगला परतावा देत आहेत. इंडियन बँक आणि आयडीबीआय बँकेच्या विशेष एफडी योजनेतील गुंतवणुकीची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर रोजी संपत आहे. या दोन बँकांच्या विशेष एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास, तुम्हाला सामान्य कालावधीपेक्षा जास्त व्याजदराचा लाभ मिळेल. जाणून घेऊयात दोन्ही बँकांच्या FD योजनांच्या व्याजदरांबद्दल 


IDBI बँक विशेष FD योजना


IDBI बँकेने आपल्या ग्राहकांसाठी 375 आणि 444 दिवसांची विशेष FD योजना सुरू केली आहे. तुम्ही या योजनेत 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता. आयडीबीआय बँकेच्या ३७५ दिवसांच्या एफडीचे नाव अमृत महोत्सव एफडी योजना आहे. या योजनेंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना 7.10 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर मिळत आहे. तर 444 दिवसांच्या एफडी योजनेंतर्गत सर्वसामान्यांना 7.15 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.65 टक्के व्याजदर मिळत आहे.


इंडियन बँकेची विशेष एफडी योजना


इंडियन बँकेने 400 दिवसांच्या कालावधीसाठी विशेष एफडी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही 400 दिवसांसाठी 10,000 ते 2 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या कालावधीत बँक सर्वसामान्यांना 7.25 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदर देत आहे. तर बँक सुपर ज्येष्ठ नागरिकांना ठेव रकमेवर 8.00 टक्के व्याजदर देत आहे.


इंड सुपर 300 दिवसांची एफडी योजना


400 दिवसांव्यतिरिक्त इंडियन बँकेने 300 दिवसांची विशेष एफडी योजना देखील सुरू केली आहे. ही योजना 1 जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 5000 ते 2 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक जमा करता येते. या एफडीमध्ये सर्वसामान्य ग्राहकांना 7.05 टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के तर अति ज्येष्ठ नागरिकांना 7.80 टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. ही योजना 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत वैध आहे.


FD वर लोकांचा विश्वास 


FICCI आणि इंडियन बँक्स असोसिएशनने (IBA) जाहीर केलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार, उच्च व्याजदरामुळं लोकांचा कल मुदत ठेवींकडे वाढला आहे. सर्वेक्षणाच्या सध्याच्या फेरीत, अर्ध्याहून अधिक म्हणजे 57 टक्के लोकांनी बचत आणि चालू खात्यातील त्यांची भागीदारी कमी केल्याचे सांगितले आहे. सामान्य लोकांचा चालू किंवा बचत खात्यांपेक्षा मुदत ठेव खात्यांवर जास्त विश्वास असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आलं आहे. 


अहवालानुसार, जास्त व्याजदरामुळे लोक आता मुदत ठेवींना अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळं चालू आणि बचत खात्यांमध्ये जमा होणारी रक्कम कमी झाली आहे. बँकांकडून जमा केलेल्या पैशांमध्ये, चालू आणि बचत खात्यातील ठेव रकमेवर कमी व्याज आकारले जाते. या दोन्ही खात्यांमध्ये जास्त पैसे जमा झाले म्हणजे बँकांना चांगले मार्जिन मिळेल. जी मुदत ठेवींमध्ये कमी होते. सध्या लोकांचा FD वर विश्वास वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


इतर खात्यांपेक्षा FD वर लोकांचा अधिक विश्वास, नेमकी काय आहेत कारणं?