नाशिक : दिंडोरी येथील वलखेड गावात काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला होता. यावेळी सर्वच स्तरावरून मोठी टीका करण्यात आली होती. तसेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देखील चौकशीचे आदेश दिले होते. मात्र आता या गावातील ग्रामपंचायतीनेच याबाबत खुलासा पत्र दिले असून सदर कार्यक्रम हा शाळेच्या आवारात नाहीतर ग्रामपंचायतच्या ताब्यात असलेल्या मैदानात झाल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबतचा खुलासा पत्र शरद पवार आणि दीपक केसरकर यांना देण्यात आले आहे. 


काही दिवसांपूर्वी नाशिकच्या (Nashik) दिंडोरी तालुक्यातील वलखेड गावात एका गणेश मंडळाच्या माध्यमातून गौतमी पाटीलचा (Gautami Patil Dance) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम गावातील जिल्हा परिषद शाळेतील (ZP School) आवारात आयोजित करण्यात आल्याचे बोलले जात होते. या कार्यक्रमाला गावकऱ्यांसह आजुबाजुंच्या नागरिकांची तोबा गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला होता. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडूनही दखल घेण्यात आली होती, शिवाय संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. तर शरद पवार यांनी देखील आक्षेप घेत चौकशीची करावी असे सांगितले होते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना एकता कला व क्रीडा मंडळ सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था व सरपंच विनायक शिंदे यांनी निवेदन देत खुलासा केला आहे. करत शाळेच्या आवारात नाहीतर गावातील मैदानात कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे निवेदन सादर करण्यात आले आहे. . 


निवेदनात म्हटले आहे की, एकता कला व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गेल्या 23 वर्षांपासून गणेश फेस्टिव्हलचे आयोजन करत विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवते. दरम्यान 27 सप्टेंबर रोजी गावाच्या खुल्या मैदानात रीतसर परवानगी घेऊन कलावंत गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमासाठी अटी व शर्तीच्या अधित राहुन जागेबाबत ना हरकत देण्यात आलेली होती. सदर कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या, मात्र त्याची नाहक चर्चा झाली. कार्यक्रम झाले ते मैदान हे जिल्हा परिषद शाळेचे नसून ग्रामपंचायतीचे ताब्यातील आहे. सदर मैदान संस्थेने रितसर भाडे भरुन ना हरकत घेऊन व पोलीस विभागाची परवानगी घेऊन तेथे कार्यक्रम घेतला आहे. शाळेच्या कर्मचाऱ्यांचा सदर कार्यक्रमाबाबत काहीही संबंध नसल्याचे निवेदनात म्हटलं आहे.  


शाळा सिग्राम कंपनीने दत्तक घेतल्याचे वृत्त निराधार 


तसेच सदर शाळा सिग्राम कंपनीने दत्तक घेतल्याचे वृत्त हे निराधार असुन सदर शाळा इमारत ही कंपनीचे सी. एस. आर. फंडातून बांधली आहे. तसेच शाळा हि मैदानाचे मागील बाजूस असून शाळा आवरापासून बरेच अंतर पुढे गावाच्या खुल्या मैदानात कार्यक्रम झाला तरी सदर प्रसिद्ध झालेले वृत्त चुकीच्या माहितीच्या आधारावर असुन त्यात काहीही तथ्य नाही. गौतमी पाटील यांचे कार्यक्रमासाठी कुठल्याही कंपनीची वित्तीय मदत न घेता एकता ग्रुपच्या सर्व सभासद व इतर ग्रामस्थ यांचे मार्फत आयोजित करण्यात आला होता. तसेच शाळेच्या कर्मचान्यांचा सदर कार्यक्रमाबाबत काहीही संबंध नाही. त्यामुळे सदर कर्मचारी याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होऊ नये, अशी मागणी निवदेनाद्वारे करण्यात आली आहे. आज मंत्री दीपक केसरकर नाशिक दौऱ्यावर आले असून दुपारी ते सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी वणी गडावर गेले होते. त्यानंतर नाशिकला दाखल झाले असून माध्यमांशी या विषयावर काय बोलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Nashik Gautami Patil : थेट शाळेच्या आवारात गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम, नाशिकच्या दिंडोरीतील प्रकार, शिक्षणमंत्री म्हणाले?