India Exports crops to pakistan : भारतातून पाकिस्तानात विविध पिकांची मोठ्या प्रमाणात निर्यात (India Exports crops to pakistan) केली जाते. सरकारनं पाकिस्तानसोबतचे काही प्रमाणात व्यापारी मार्ग बंद केले होते. मात्र त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचे व्यवहार सुरू झाले आहेत. विविध पिकांसह भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंचे व्यवहार भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू आहेत. पाकिस्तानची 25 कोटींहून अधिक लोकसंख्या अजूनही काही गोष्टींसाठी भारतावर अवलंबून आहे. भारतातून पाकिस्तानात नेमक्या कोणत्या पिकांची निर्यात होते, यासंदर्भातील माहिती पाहुयात.
भारताकडून या पिकांची पाकिस्तानला निर्यात
अत्यंत खराब द्विपक्षीय संबंध असूनही, भारत आणि पाकिस्तान दरम्यान आवश्यक पिकांचा व्यापार होत आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली 26 सप्टेंबर 2023 रोजी अमृतसर येथे झालेल्या बैठकीनंतर हा व्यापार मार्ग खुला करण्यात आला आहे. अन्नधान्याची गरज असलेला पाकिस्तान आजही भारताकडून कापूस, टोमॅटो, कांदा, तेलबिया या पिकांची आयात करतो. यासोबतच पाकिस्तान भारताकडून कच्ची साखरही घेत आहे. याशिवाय चहाची पाने, कॉफी आणि मसालेही भारतातून पाकिस्तानला पाठवले जातात. तसेच पाकिस्तान भारताकडून आंबा, केळी, पेरु, संत्री, द्राक्षे, सफरचंद इत्यादी ताजी फळे खरेदी करतो. भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारी संबंध सुधारण्यासाठी या पिकांच्या निर्यातीला चालना मिळू शकते. याचा फायदा दोन्ही देशातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होणार आहे.
दरम्यान, कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार थांबला होता. जो नंतर पुन्हा सुरु झाला. एप्रिल 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये सुमारे 1.35 अब्ज डॉलरचा व्यापार झाला. भारतासोबतचे व्यापारी मार्ग खुले करण्याची मागणी पाकिस्तानमध्ये जोर धरू लागली होती. नैसर्गिक आणि राजकीय परिस्थितीमुळे भाजीपाला आणि फळांच्या किंमतीत पाकिस्तानात मोठी वाढ झाली असून देशभरातील हजारो एकरातील पिके नष्ट झाली आहेत.
पाकिस्तानचे आर्थिक मॉडेल अपयशी
जागतिक बँकेने (World bank) पाकिस्तानची स्थिती दाखवून जगासमोर लाजवले आहे. जागतिक बँकेने स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानचे आर्थिक मॉडेल अपयशी ठरले आहे. इथे गरिबांसाठी काहीच नाही. श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्यासाठी सर्व धोरणे आखली जात आहेत. पाकिस्तानमध्ये गरिबी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचं जागतिक बँकेने म्हटलं आहे. डॉन वृत्तपत्राने जागतिक बँकेचे कंट्री डायरेक्टर नाजी बेनहासीनच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे. पाकिस्तानला अशी धोरणे बदलण्याची गरज आहे, की ज्याचा देशाच्या विकासावर परिणाम झाला आहे. पाकिस्तानच्या धोरणाचा फायदा काही लोकांनाच झाला असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. हवामान बदलाचा मोठा फटका पाकिस्तानला बसला आहे. सध्या पाकिस्तानने त्यांची कृषी क्षेत्रातील आणि ऊर्जा क्षेत्रातील धोरणे सुधारली पाहिजेत असं मत बेनहासीन यांनी व्यक्त केलं आहे. शेती, अनुदान आणि इतर अनेक उणिवा दूर करण्याची गरज आहे. जेणेकरून देशातील छोट्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकेल असं बेनहासीन म्हणाले . तसेच, अधिकाधिक लोकांना शेतीमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करता येईल. पाकिस्तानच्या खराब आर्थिक मॉडेलमुळं तो आपल्या सहकारी देशांच्या तुलनेत खूपच मागे पडला असल्याचं मत बेनहासीन यांनी व्यक्त केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: