India Export : देशांतर्गत बाजारपेठेत गहू (wheat), तांदूळ (Rice) आणि साखरेच्या (Sugar) किंमतीत सतत वाढ होत आहे. या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, भारत सरकारनं निर्यातीवर बंदी (export ban) घातली आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाचा भारताच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. सरकारच्या या निर्णयामुळं 2023-24 या आर्थिक वर्षात निर्यात 4 ते 5 अब्ज डॉलर्सने कमी होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारला महागाईबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यामुळं सरकारनं गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याचं बोललं जात आहे. 


सरकारच्या निर्णयाचा निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता


देशांतर्गत बाजारपेठेत असमान पावसामुळं गहू, तांदूळ आणि ऊसाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळं देशांतर्गत बाजारात पीठ, तांदूळ आणि साखर महाग झाली आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे महागाईचा धोका पत्करू नये म्हणून सरकारने गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घातल्याचे बोलले जात आहे. भारत या खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात निर्यात करत होता. परंतू देशांतर्गत बाजारपेठेत या गोष्टींची उपलब्धता वाढावी यासाठी सरकारने गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाचा निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, साखर, तांदूळ आणि गहू निर्यातीवर निर्बंध असल्याने 4 ते 5 अब्ज डॉलरची निर्यात कमी राहू शकते.


2022-23 मध्ये देशाची कृषी उत्पादनांची निर्यात 53 अब्ज डॉलर्स 


प्रमुख कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी असूनही, चालू आर्थिक वर्षात भारताची कृषी निर्यात गेल्या वर्षीच्या 53 अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचू शकते. गेल्या आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये देशाची कृषी उत्पादनांची निर्यात 53 अब्ज डॉलर्स होती. राजेश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध लादूनही आम्ही पूर्वीच्या स्तरावर पोहोचू अशी आशा आहे. केळीसारखी नवीन उत्पादने आणि बाजरीपासून बनवलेली मूल्यवर्धित उत्पादने नवीन जागतिक गंतव्यस्थानांवर नेण्यासाठी सरकार निर्यातीला प्रोत्साहन देत असल्याचे ते म्हणाले. 


केळीची निर्यात एक अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा


येत्या तीन वर्षांत केळीची निर्यात एक अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत फळे आणि भाजीपाला, डाळी, मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीचा वाढीचा दर चांगला राहिला आहे. मात्र, तांदळाची निर्यात 7.65 टक्क्यांनी घसरुन 6.5 अब्ज डॉलरवर आली आहे.


लाल समुद्रात इराण समर्थित हुथी बंडखोरांनी जहाजांवर केलेल्या हल्ल्यामुळे भारत सरकारची चिंता वाढली आहे. या हल्ल्याचा आफ्रिकेतील निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. भारत सरकार आफ्रिकेत निर्यातीसाठी पर्यायी मार्गांचा विचार करत आहे. मात्र, त्यामुळे निर्यात होणाऱ्या मालाच्या किमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढू शकतात.


महत्त्वाच्या बातम्या:


सरकारचा प्लॅन! ग्राहकांना दिलासा शेतकऱ्यांना फटका; कांदा निर्यातबंदीनंतर दरात मोठी घसरण