Potato Price News : सध्या देशात कांदा (Onion), टोमॅटोच्या दरात (Tomato price) मोठी वाढ होत आहे. आता याचबरोबर बटाट्याच्या दरात (Potato Price) देखील वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) फायदा होत आहे. मात्र, ग्राहकांना फटका बसतोय. त्यामुळं केंद्र सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत. दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार भूतानवरुन बटाट्याची आयात करण्याची तयारी करत आहे.
भूतानसह इतर देशातून बटाट्यांची आयात होण्याची शक्यता
महागड्या भाज्यांमुळं ग्राहकांना फटका बसत आहे. मात्र, येत्या काही दिवसात सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. बटाट्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार विविध उपाययोजनांवर विचार करत आहे. त्यासाठी शेजारील भूतानसह इतर देशांतून लवकरच बटाट्याची आयात सुरु करण्याची शक्यता वर्तवली जातेय. देशात बटाट्याचे कमी उत्पादन झाल्यामुळं भाव चढेच राहू शकतात. अशा परिस्थितीत सरकार दर कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांवर विचार करत आहे. अशातच शेजारील देश भूतानमधून बटाटे आयात करण्यास सरकार परवानगी देऊ शकते. इतर देशांतून बटाटे आयात करण्याचाही विचार केला जाऊ शकतो.
बटाटा उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक
सरकार सध्या व्यापाऱ्यांना कमी प्रमाणात बटाटे आयात करण्याची परवानगी देऊ शकते. भूतानमधून बटाटे खरेदी करण्यास सरकारने गेल्या वर्षी मान्यता दिली होती. गेल्या वर्षी सरकारने दिलेल्या मान्यतेनुसार, व्यापारी भूतानमधून बटाटे खरेदी करू शकत होते. जून 2024 पर्यंत परवान्याशिवाय भारतात आणू शकत होते. पण आता परवानगीची गरज आहे. बटाटा उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. बटाटा उत्पादनात भारतापेक्षा फक्त चीनच पुढे आहे. गेल्या वर्षी भारतात 60.14 दशलक्ष टन बटाट्याचे उत्पादन झाले होते. यंदा बटाट्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, यावर्षी देशात बटाट्याचे उत्पादन सुमारे 58.99 दशलक्ष टन असू शकते.
प्रमुख बटाटा उत्पादक राज्यांमध्ये बटाटा पिकावर परिणाम
खराब हवामानामुळं पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये बटाटा पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळं कांदा, टोमॅटोप्रमाणे बटाट्याचे भावही वाढू लागले आहेत. टोमॅटो, कांदा आणि बटाट्याची महागाई 48.4 टक्क्यांवर पोहोचली आहे. बटाट्याचे दर असेच वाढत राहून ऑक्टोबरपासून बाजारात तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. साधारणत: दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बाजारात बटाट्याचा तुटवडा भासतो, मात्र यावेळी त्याचा परिणाम आधीच दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या: