Income Tax Raid : आयकर विभागाने (Income Tax) आज केलेल्या कारवाईचा परिणाम कंपनीच्या शेअर दरावरही (Share Price) झाला. आज आयकर विभागाने 'पॉलीकॅब इंडिया'शी (Polycab India) संबंधित 50 हून अधिक ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले. मुंबईत कंपनीशी संबंधित ठिकाणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांचे निवासस्थान, कार्यालये यांचाही समावेश आहे. आयकर विभागाच्या कारवाईने पॉलीकॅब इंडियाच्या शेअर दरात घसरण झाली आहे.
पॉलीकॅब इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज 4 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली. आज दिवसखेर कंपनीचा शेअर 5,362.85 रुपयांवर बंद झाला. गेल्या 15 दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण सुरू आहे. या छाप्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर होताना दिसत आहे. पॉलीकॅब इंडिया लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी वायर आणि केबल उत्पादन कंपनी आहे. या कंपनीचा व्यवसाय देशभर पसरलेला आहे.
आयकर विभागाची कारवाई का?
आयकर विभाग पॉलीकॅब इंडियाच्या 50 हून अधिक ठिकाणांवर कर चुकवेगिरीच्या प्रकरणात छापेमारी करत आहे. फर्मच्या उच्च व्यवस्थापनाच्या निवासस्थानांची आणि कार्यालयांचीही झडती घेतली जात आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर सकाळी पॉलीकॅबचा शेअर 5.04 टक्क्यांनी घसरून 5,335 रुपयांवर व्यवहार करत होता. BSE वर शेअर 5,404 रुपयांवर आला. कंपनीसाठी हा मोठा धक्का आहे. या वर्षी तिच्या शेअर्सची किंमत दुप्पट झाली होती.
कंपनीला झाला होता नफा
सप्टेंबरमध्ये कंपनीने चांगलाच नफा नोंदविला होता. 11 डिसेंबर रोजी पॉलीकॅब इंडियाचे बाजार भांडवल सुमारे 85 कोटी रुपयांवर पोहोचले होते. मार्केट कॅपच्या बाबतीत कंपनीने हॅवेल्स इंडियाला मागे टाकले. पॉलीकॅब इंडिया इतर इलेक्ट्रिकल वस्तूंव्यतिरिक्त वायर आणि केबल्सचे उत्पादन आणि विक्री करते. देशभरात 23 उत्पादन सुविधा, 15 कार्यालये आणि 25 पेक्षा जास्त गोदामांसह पसरलेले आहे. कंपनीने जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी 436.89 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा जाहीर केला होता.
(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी असून शेअर विषयक सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)