ITR Filing : प्राप्तीकर विभागाकडून करदात्यांना जो SMS पाठवण्यात येत आहे, त्यामधील भाषा आता सौम्य झाली आहे. प्राप्तीकर विभागाकडून येणाऱ्या एसएमएसमध्ये आता  करदात्यांना टॅक्स लवकरात लवकर भरा, असे आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये डेडलाईननंतर भरावा लागणारा दंड टाळण्यासाठी लवकरात लवकर कर भरण्याचे आवाहन करण्यात येतेय. 


प्राप्तीकर विभाग मवाळ झाला - 
गेल्या आठवड्यात प्राप्तीकर विभागाकडून करदात्यांना धमकीवजा विनंती करणारे एसएमएस येत होते, असं म्हटले जात होतं. त्यामुळे सोशल मीडियावर प्राप्तीकर विभागाविरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच अनेकांनी ट्रोलही केले होते. 


काय होता एसएमएस?
"प्रिय (पॅन नंबर) कारवाईपासून वाचण्यासाठी आर्थिक वर्ष 2022-23 साठी www.incometax.gov.in या संकेतस्थळावर 31 जुलै, 2022 पूर्वी आयकर रिटर्न भरायला विसरु नका." 


आता काय येतोय एसएमएस?
सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर प्राप्तीकर विभागाने एसएमएसमधील भाषाशैलीमध्ये बदल केलाय. आता येणाऱ्या एसएमएसमध्ये असे म्हटलेय की,  "प्रिय (पॅन नंबर) दंडाच्या रक्कम भरण्यापासून वाचण्यासाठी आर्थिक वर्ष 2022-23 साठी www.incometax.gov.in वर 31 जुलै 2022 आधी आयकर रिटर्न भरायला विसरु नका. 




ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै
यावर्षी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख वाढवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. आर्थिक वर्ष 2021-22 किंवा मूल्यांकन वर्ष 2022-2023 साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. यावेळी सरकारने मुदतवाढ न देण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, संकेतस्थळ व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रार ट्विटरवरील अनेक युजर्स करत आहेत.  जर तुम्ही अंतिम मुदतीपर्यंत ITR दाखल करू शकत नसाल, तर तुम्हाला ITR उशिरा दाखल करताना दंड भरावा लागेल. याशिवाय, तुम्हाला आयकर विभागाकडून प्राप्तिकर सूचना मिळू शकते. यानंतर, तुम्हाला कर भरावा लागेल, तसेच दंड भरावा लागेल.


ही मंडळी दंडाशिवाय ITR भरू शकतात


आयकराशी संबंधित कायद्यानुसार, अंतिम मुदत संपल्यानंतर प्रत्येकाला आयटीआर भरण्यासाठी विलंब शुल्क भरावे लागत नाही. जर एखाद्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त नसेल, तर त्याला उशीरा ITR भरताना दंड भरावा लागणार नाही. जर एकूण उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त नसेल, तर कलम 234F अंतर्गत ITR वर कोणतेही विलंब शुल्क आकारले जात नाही.