मुंबई : माझंही स्वत:चं एक छानसं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. या घरात मला आवडणाऱ्या सर्व गोष्टी असाव्यात असंही प्रत्येकाला वाटतं. पण आजघडीला घराच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. छोटेखानी घर घ्यायचं म्हटलं तरीही आज लाखो रुपये खर्च करावे लागतात. मध्यमवर्गीय, गरीब कुटुंबात जन्माला येणाऱ्या व्यक्तीसाठी मनासारखं घर घेणं, आयुष्यभर स्वप्नच राहतं की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण अगदी 50 लाख रुपयांचं घर फुकटात घेणं आज शक्य आहे. हे कसं शक्य होईल ते जाणून घेऊ या.
अगोदर योग्य नियोजन करावं लागेल
घर घेण्यासाठी आज अनेकांकडे पैसे नसतात. त्यामुळे अनेकजण वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज घेतात. गृहकर्जाच्या माध्यमातून घरखरेदीसाठी पैसे घेऊन नंतर त्याची परतफेड केली जाते. हा पर्याय सोपा वाटत असला तरी यात घरमालकाचे कित्येक लाख रुपये फक्त व्याजात जातात. अनेक लोक तर घराच्या किमतीएढेच फक्त व्याज देतात. पण घर फुकटात घेणे शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या पैशांचे योग्य नियोजन करावे लागेल.
तुमच्या जवळ असणारे पैसे योग्य ठिकाणी गुंतवून तुम्ही फुकटात घर घेऊ शकता. एसआयपी हा त्यासाठीचा योग्य पर्याय ठरू शकतो. कारण एसआयपीएमध्ये चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. या चक्रवाढ व्याजामुळे तुम्ही गुंतवलेल्या रकमेतून तुम्हाला भरपूर नफा मिळतो. त्यामुळे तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून घरासाठी गेलेले व्याज तसेच घराची किंमत परत मिळवू शकता.
गृहित धरा बँकेकडून घेतलं कर्ज
आता स्वप्नातले घर फुकटात कसे खरेदी करता येईल हे पाहुया. समजा तुम्ही जे घर घेताय त्याची एकूण किंमत 50 लाख रुपये आहे. ही रक्कम जमवण्यासाठी तुम्ही गृहकर्जाचा पर्याय निवडला आहे, असे गृहित धरू. आजघडीला बँका गृहकर्जावर 8 ते 9 टक्क्यांनी व्याज घेतात. तुम्हाला गृहकर्ज 8.5 टक्के दराने मिळाले आहे आणि या कर्जाची तुम्हाला 25 वर्षांत परतफेड करायची आहे, असे आपण गृहित धरूया.
गृहकर्जाच्या रुपात बँकेला किती रुपये द्यावे लागतील?
म्हणजेच 50 लाख रुपयांच्या गृहकर्जावर तुम्हाला प्रतिवर्ष 8.5 टक्के या दराने महिन्याला 40,261 रुपये ईएमआय येईल. हा ईएमआय 25 वर्षे सलग भरल्यास तुम्ही एकूण 70 लाख 78 हजार 406 रुपये व्याज द्याल. म्हणजेच 25 वर्षांत 50 लाखांच्या गृहकर्जासाठी तुम्ही बँकेला एकूण 1 कोटी 20 लाख 78 हजार 406 रुपये द्याल.
फुकटात घर कसे मिळवायचे?
फुकटात घर मिळवायचे असेल तर तुम्हाला एसआयपीचा गांभीर्याने विचार करावा लागेल. ज्या दिवसापासून तुमच्या गृहकर्जाचा हफ्ता चालू झाला आहे, त्याच दिवसापासून तुम्ही एसआयपी केल्यास गृहकर्जाच्या रुपात गेलेली तुमची सर्व रक्कम परत मिळ शकते. तुमचा 40,261 रुपयांचा गृहकर्जाचा हफ्ता चालू झालेला असताना त्याच महिन्यात तुम्ही 7000 रुपयांची एसआयपी करायची. ही एसआयपी तुमचा गृहकर्जाचा कालावधी संपेपर्यंत चालू ठेवावी. म्हणजेच तुम्ही सतत 25 वर्षे 7000 रुपयांची एसआयपी केल्यास तुमचे बँकेला गेलेले 1 कोटी 20 लाख 78 हजार 406 रुपये परत मिळतील.
अशी करा गुंतवणूक
एसआयपी ही भांडवली बाजाराशी जोडलेली असल्यामुळे यात पैसे बुडण्याचीही जोखीम असते. पण एसआयपीवर केलेल्या गुंतवणुकीवर साधारण 12 टक्के दराने परतावा मिळतो, असे गृहित धरले जाते. या हिशोबाने तुम्ही प्रतिमहिना 7000 रुपयांची एसआयपी सलग 25 वर्षांसाठी केल्यास तुम्ही एकूण 21 लाख रुपयांची गुंतवणूक कराल या गुंतवणुकीतून तुम्हाला 25 वर्षांत 1 कोटी 11 लाख 83 हजार 446 रुपये व्याज मिळेल. 25 वर्षांनी तुमचे गृहकर्ज संपेल तेव्हा तुम्हाला एसआयपीतून तब्बल 1 कोटी 32 लाख 83 हजार 446 रुपये मिळतील. 25 वर्षांसाठीच्या गृहकर्जासाठी तुम्ही जेवढे पैसे देत आहात, तेवढेच पैसे तुम्हाला एसआयपीमुळे परत मिळतील. म्हणजेच तुम्हाला तुमचे घर फुकटात मिळेल. अशा पद्धतीने एक रुपयाही न देता तुमचे घर तुमच्या मालकीचे होईल. तसेच 25 वर्षांनंतर तुमच्या घराची किंमत कित्येक कोटी झालेली असेल. ही संपत्तीही तुमच्या नावावर झालेली असेल.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
महागड्या गाड्या, आलिशान घर! कोलकाताला IPLची ट्रॉफी मिळवून देणारा, श्रेयस अय्यर किती कोटींचा मालक?
कोलकाता जिंकली, पण IPL मधून शाहरुखला किती प्रॉफिट होतो? जाणून घ्या कमाईचं गणित