PAN Card And Aadhar Card : पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे आजच्या काळातील महत्त्वाचे दस्ताऐवज आहेत. आर्थिक व्यवहारामध्ये पॅन कार्डचा वापर केला जातो. तर, आधार कार्ड हे ओळखपत्रासारखे वापरले जाते. आधार कार्डमध्ये व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, पत्ता आदी माहिती नमूद असते. मात्र, एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर या महत्त्वाच्या दस्तऐवजांचा वापर करून काही सायबर घोटाळेदेखील झाले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे व्यक्तीच्या निधनानंतर या दस्तऐवजांचे काय करायचे हा प्रश्न निर्माण होतो. 


पॅन कार्डचे काय करावे?


आर्थिक व्यवहारांच्या बाबीसाठी पॅन कार्ड ही महत्त्वाची बाब आहे. बँक खाते उघडण्यापासून ते आयकर विवरण दाखल करण्यासाठीदेखील पॅन कार्डची आवश्यकता असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीचे पॅन कार्ड जपून ठेवावेत. संबंधित व्यक्तीच्या पश्चात असलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होईपर्यंत पॅन कार्ड जपून ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये आयटीआर दाखल करणे, विमा दावा करणे आदी बाबींचा समावेश आहे. सर्व आर्थिक व्यवहारांबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पॅन कार्ड जमा करावे. 


पॅन कार्ड जमा कसे करावे 


पॅन कार्ड जमा करण्यासाठी असेसमेंट ऑफिसरला एक अर्ज द्यावा लागतो. या अर्जात तुम्हाला पॅन कार्ड जमा करण्याचे कारणदेखील नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर मृत व्यक्तीचे नाव, जन्म तारीख, मृत्यूचा दाखला, पॅन कार्ड क्रमांक आदी माहिती नमूद करावी लागणार आहे. ही माहिती त्या अर्जासोबत द्यावी लागणार. जर, तुम्हाला मृत व्यक्तीच्या पॅन कार्डची आवश्यकता भविष्यात भासू शकते असे वाटत असेल तर पॅन कार्ड जमा करणे अनिवार्य नाही. मात्र, त्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी त्याचा डेटा जपून ठेवावा. 


आधार कार्डचे काय करावे?


सध्या आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून केले जाते. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जातो. आधार क्रमांक हा युनिक क्रमांक आहे. UIDAI हा क्रमांक संबंधित व्यक्तिच्या निधनानंतर इतर कोणालाही देऊ शकत नाही. 


आधार कार्डधारक व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्डला निष्क्रिय केले जाऊ शकत नाही. सध्या सरकारने आधार क्रमांक रद्द करण्याबाबत कोणतीही तरतूद केली नाही. आधार कार्डला मृत्यू प्रमाणपत्राशी लिंक करता येऊ शकते. दोन्ही लिंक झाल्यास मृत व्यक्तीच्या आधार कार्डचा संभाव्य दुरुपयोग टाळता येऊ शकतो.