मुंबई : सोनं प्रत्येकालाच आवडतं. सोन्याच्या धातूची आभूषणं घालून फिरणं हे आज प्रतिष्ठेचं माणलं जातं. अनेकजण गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने करून ठेवतात. अनेकांच्या तिजोऱ्या सोन्याच्या दागिन्यांनी भरलेल्या असतात. पण खरंच एखादी व्यक्ती मनाला वाटेल तेवढं सोनं घरात साठवू शकते का? सोनं साठवण्याबाबत सरकारचे काही नियम आहेत का? हे जाणून घेऊ या...


किती सोनं खरेदी करता येतं? (Gold Purchasing)


भारतात अनेकजण सोनं घरात ठेवणं पसंद करतात. अनेकजण बँकांच्या लॉकरमध्ये सोनं ठेवून देतात. सोनं हा मौल्यवान धातू आहे. त्यामुळे सरकारने सोन्याच्या खरेदीबाबत काही नियम तयार केलेले आहेत. तसं पाहायचं झालं तर एखादी व्यक्ती कितीही सोनं खरेदी करू शकते. सोने खरेदीच्या प्रमाणावर कोणतेही बंधन नाही. एखादी व्यक्ती अमूक प्रमाणातच सोनं खरेदी करू शकते, असे सांगणारा कोणाताही नियम अस्तित्वात नाही. फक्त तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याची माहिती तुम्हाला देता आली पाहिजे. तुम्ही घरातील सोनं कोठून खरेदी केलं, त्यासाठीचा पैसा तुम्ही कोठून जमा केला, आदी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजेत. प्राप्तिकर अधिनियमानुसार एखादा प्राप्तिकर अधिकारी तुम्हाला तुमच्या कमाईबद्दल विचारत असेल, कमाईचे स्त्रोत विचारत असेल तर तुम्हाला ते सांगता आले पाहिजे. त्याच पद्धतीने सोने खरेदीसाठी कोठून पैसे आले, हे तुम्हाला सांगता आले पाहिजे. 


सोनं खरेदी केल्यानंतर कर लागतो का? 


सोनं खरेदी करताना तीन टक्के जीएसटी लागतो. देशभरात हा नियम लागू आहे. मात्र प्राप्तिकर विभागासाठी धोरण ठरवणाऱ्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानुसार (सीबीडीटी) एखादी व्यक्ती जाहीर केलेल्या मिळकतीतून हवं तेवढं सोनं खरेदी करू शकते. त्यासाठी संबंधित व्यक्तीला कोणताही अतिरिक्त कर देण्याची गरज नाही. संबंधित व्यक्तीला टॅक्स स्लॅबनुसारच कर द्यावा लागेल. मात्र वंशपरंपरेने आलेल्या सोन्यावर कोणताही कर लागत नाही. अशा प्रकारे जमा केलेल्या सोन्यावर तुम्हाला अतिरिक्त कर द्यावा लागत नाही.


घरात किती सोनं ठेवू शकता? 


सीबीडीटीच्या नियमानुसार एक विवाहित महिला पुराव्याव्यतिरिक्त घरात साधारण 500 ग्रॅमपर्यंतचे सोने ठेवू शकते. हीच मर्यादा अवविवाहित महिलेसाठी 250 ग्रॅम आहे. पुरुषाला कोणताही पुरावा नसताना स्वत:जवळ 100 ग्रॅमपर्यंतचे सोने ठेवता येते. 


हेही वाचा :


आरबीआयच्या निर्णयामुळे खळबळ! एडलवाईजच्या दोन मोठ्या कंपन्यांविरोधात केली मोठी कारवाई


गौतम अदाणी खरंच पेटीएममध्ये गुंतवणूक करणार? नेमकं सत्य काय? वाचा सविस्तर


निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात नेमकं काय घडणार? जाणून घ्या मार्केटचा 20 वर्षांचा इतिहास!