Real Estate: : कोरोना महासाथीनंतर अर्थव्यवस्थेत पूर्वपदावर येत असून देशातील  प्रमुख आठ शहरातील घरांच्या विक्रीत 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील 9 वर्षातील ही सर्वाधिक घरविक्री आहे. नाइट फ्रँक इंडियाने आपल्या अहवालात ही बाब नमूद केली आहे. मुंबईत एका कॅलेंडर वर्षात 2022 मध्ये 85, 169 फ्लॅटची विक्री करण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ 35 टक्के आहे. 


नाइट फ्रँक इंडियाचे वरिष्‍ठ कार्यकारी संचालक गुलाम झिया यांनी सांगितले की, ‘‘सातत्यपूर्ण मागणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या निवासी बाजारपेठेने 2022 मध्ये विक्रमी उच्चांकी विक्री नोंदवली. उत्पन्नाच्या पातळीत वाढ, घराच्या मालकीची गरज आणि घर खरेदीची तीव्र इच्छा शक्ती असणे आदी कारणांमुळे मुंबईतील बाजारपेठेत घरांच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. गृहकर्जाच्या दरांमध्ये झालेल्‍या वाढीचा गतीवर परिणाम झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. दरवाढ होऊन देखील घर खरेदी करण्याची क्षमता अद्यापही असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. गृहकर्ज दरांवर परिणाम होऊन रेपो दरांमध्ये आणखी काही वाढ होण्याची अपेक्षा असताना देखील मुंबई बाजारपेठेतील मागणी स्थिर राहू शकते अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याशिवाय, 50 लाख आणि त्‍याखालील किंमतीच्‍या घर खरेदीत मंदी जाणवण्याची शक्यता असली तरी या घरांच्या मागणीत वाढ होईल असेही त्यांनी म्हटले. 


कार्यालयीन जागेच्या मागणीत वाढ


वर्ष 2022 मध्ये कार्यालयीन वापरासाठीच्या जागेत वाढ झाली असल्याचे नाईटफ्रँकने आपल्या अहवालात नमूद केले आहे. मुंबई महानगर प्रदेश विभागात 2022 च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये 3.4 दशलक्ष चौरस फूट जागा भाडेतत्वावर देण्यात आली. त्याच्या मागील वर्षी 2021 मध्ये याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ तब्बल 59 टक्के इतकी आहे.


वर्ष 2022 च्‍या दुसऱ्या सहामाहीमध्‍ये भाडेदरात वार्षिक तीन टक्‍क्‍यांची काहीशी वाढ झाली. मागील तीन तिमाहींमध्ये मुंबई कार्यालयीन बाजारपेठेचे सरासरी भाडेस्थिर राहिले, असेही नाईटफ्रँकच्या अहवालात नमूद करण्यात आले. 


घराच्या किंमतीत वाढ 


वर्ष 2022 च्‍या दुसऱ्या सहामाहीमध्‍ये घरांच्या किंमतीत वार्षिक 7 टक्‍क्यांची वाढ नोंदवण्यात आली. सरासरी निवासी मालमत्ता किंमतींमध्‍ये 2021 च्‍या पहिल्‍या सहामाहीपासून वाढ होताना दिसून आले. वर्ष 2017 च्‍या पहिल्‍या सहामाहीपासून पहिल्‍यांदाच किंमतीत ही वाढ दिसण्‍यात आली. कच्‍च्या मालाच्‍या वाढलेल्‍या किंमती, ग्राहकांकडून वाढलेली मागणी यामुळे घरांच्या किंमतीत वाढ होण्याची प्राथमिक कारणे असल्याचे म्हटले जाते.